फैजपूर : 57 कोटी रुपयांची थकबाकी थकबाल्याने जळगाव जिल्हा बँकेने सोमवारी यावल-रावेर तालुक्याचा आर्थिक कणा व मानबिंदू असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी दोन महिने आधी जिल्हा बँकेने कारखान्याची मालमत्ता जप्तीची नोटीस दिली होती मात्र त्यानंतरही कर्जाची रक्कम अदा न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
अखेर कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात
मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटांचा सामना करीत असतानाच गेल्या दोन वर्षापासून बंद होता. मधुकर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तावही समोर आला होता त्यासाठी दोन वेळा प्रक्रिया राबवूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेने 57 कोटींच्या थकबाकी पोटी सेक्युरायटेशन अॅक्ट अंतर्गत कारखान्याची मालमत्ता जप्तीची नोटीस कारखान्याला दिली. या दरम्यान सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी संचालक यांची संयुक्त बैठक होऊन जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई स्थगित ठेवावी, अशी एकमुखी मागणी जिल्हा बँकेकडे केली होती मात्र त्या मागणीच्या कुठलाच उपयोग झाला नाही.
नोटीस कालावधी संपताच कारवाई
शनिवार, 16 एप्रिल रोजी दिलेल्या नोटीसी प्रमाणे दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्याने सोमवार दि. 25 रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, महाव्यवस्थापक एम.टी.चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी 57 कोटींच्या कर्जापोटी कारखान्याची मालमत्ता सील करीत जप्तीची कारवाई पूर्ण केली. यावेळी चेअरमन शरद महाजन, संचालक नितीन चौधरी, सचिव रत्नदीप वायकोळे यांची उपस्थिती होती. दरम्यान, मधुकर जिल्हा बँकेने ताब्यात घेतल्यावर परिसरातील शेतकरी कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहेत.