मुंबई : पारदर्शीच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आमचा टेकू देण्यापूर्वी सरकार स्थापन होण्यापूर्वी कसे बहुमत मिळवले हे सांगावे. मुख्यमंत्री म्हणून निवड होताना आपल्याला नेमका कोणाचा पाठींबा होता हे सांगावे. तेव्हाच खरा तुमचा पारदर्शीपणा सिद्ध होईल असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी आपल्या चांदिवलीतील प्रचाराच्या सभेची तोफ डागली. मी वाट पाहतोय मुंबईत नरेंद्र मोदींची सभा होतेय का मला पाहायचे आहे कारण मोदींच्या सभे नंतर शिवसेनेचा झालेला विजय मला पाहायचा आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त करून भाजपला थेट आव्हान दिले आहे.
औकात शिवसैनिक दाखवतील
मुंबईसाठीचा लढा हा माझ्या आजोबांनी सुरु केला होता, त्यावेळी पक्ष नव्हते मात्र त्यांनी भावनेला साद घातली होती. आता मात्र मुंबईकरांच्या भावनेला हात घातला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. कर भरणारा म्हणून मुंबईकर अशी ओळख मुंबईकराची झाली आहे. दरवर्षी 2 लाख कोटी रुपयांचा कर केंद्र सरकारला जात आहे. त्यापैकी फक्त 25 टक्के म्हणजे 25 कोटी आम्हाला परत द्या हि मागणी होती, ते आले असते तर गरिबी नष्ट झाली असती. मुंबईकरांसाठी अजून काही शिवसेनेला करता आले असते मात्र तसे झाले नाही असे सांगत त्यांनी भाजपचा समाचार घेतला. बाबासाहेब स्मारकाचे भजमिपूजन झाले पण त्याच्या कामाचे एकही टेंडर निघाले नाही. टेंडर नसेल आणि पंतप्रधान यांच्या हस्ते भूमिपूजन झाले मात्र त्यासाठी अद्याप एकही वीट लागली नाही. त्यामुळे हा कायदेशीर गुन्हा होतो का हे पाहावे लागेल असा प्रतिवाद यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. माझा जन्म मुंबईतलाच, त्यामुळे मुंबईच्या वेदना मला माहित आहेत कारण अस्सल मुंबईकराला शिवसेनाच हवी आहे. येत्या निवडणुकीत कुणाची औकात कुणाला दाखवायची, हे शिवसैनिक दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.