पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथील उद्यमनगर, बॉईज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांच्या हाती कॅश लागली नाही. त्यांना रिकाम्या हातीच माघारी परतावे लागले. चोरट्यांनी एटीएम सेंटरच्या दरवाज्याचे काच फोडून नुकसान केले आहे. या घटनेची प्राथमिक नोंद संत तुकारामनगर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
मशीन फोडण्यात अपयश
चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यात त्यांना यश आलेले नाही. मशीन न फुटल्याने आतील कॅश सुरक्षित राहिली आहे. कॅश हाती न लागल्याने चोरट्यांनी संतापाच्या भरात एटीएम सेंटरच्या दरवाज्याची काच फोडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संत तुकारामनगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी करून बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यानंतर बँक अधिकारी व कर्मचारीदेखील तेथे हजर झाले. मशीनमधून कॅश चोरीस गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.