भुसावळ । शहरातील बसस्थानकासमोरील रेल्वेच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या अतिक्रमिताना सोमवारी सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले. चार दिवसांपूर्वीच अतिक्रमिताना बाहेर निघण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. सहा क्वार्टर्ससह 29 झोपडे दोन जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले.
दिवसभर चालली कारवाई
रेल्वेच्या जागेवर गेल्या पाच ते दहा वर्षांपासून बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून अनधिकृतरित्या हॉटेल व्यवसाय चालवणार्यांवर विक्रेत्यांवर रेल्वेच्या विशेष पथकाने गत महिन्यात 28 ऑगस्ट रोजी कारवाई केली होती तर उर्वरीत पक्के बांधकाम करणार्या लोकांना तातडीने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावूनही त्यांनी दखल न घेतल्याने सोमवारी प्रचंड बंदोबस्तात हे अतिक्रमण पाडण्यात आले. दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमण काढणार्यांनी दिवसभर सामानाची वाहतूक केली.
प्रचंड पोलीस बंदोबस्त; रेल्वे अधिकार्यांचीही उपस्थिती
रेल्वे जागेवरील अतिक्रमण हटवताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले होते. यार्डचे निरीक्षक डी.एच.पाटील व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही.के.लांजीवार यांच्या नेतृत्वातील 38 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, लोहमार्गचे 20 तर स्थानिक 30 पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते. अतिक्रमण हटवण्याच्या प्रसंगी रेल्वेचे डीई एम.एस.तोमर, एसएससी राजेंद्र देशपांडे, सचिन मुरलिधर यांच्यासह 50 रेल्वे कर्मचार्यांची उपस्थिती होती.
मोकळ्या जागेवर होणार पार्किंग स्टॅण्ड
बसस्थानकासमोरील रेल्वेच्या प्रशस्त जागेवर लोहमार्ग पोलीस ठाण्याची सुसज्ज ईमारत उभारली जाणार असून पे पार्किंग स्टॅण्डही उभारले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या शिवाय रेल्वे स्थानकाचा प्रशासनाकडून विस्तार केला जात असल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या जागेवर पार्सल कार्यालयाचा विस्तार तसेच प्रशस्त प्रवेशद्वारही उभारले जाणार आहे. रविवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह पदाधिकार्यांनी बसस्थानक मार्गाची पाहणी केली होती. रेल्वेतर्फे बसस्थानक परीसराचा कायापालट केला जाणार असून रस्ता 19 मीटरचा केला जाणार असल्याने अवैध वाहतूकदारांना बाहेर काढले जाणार आहे.
पक्के बांधकामही तोडले
रेल्वेच्या जागेवर रेल्वेच्याच काही कर्मचार्यांनी पक्के बांधकाम करून घर उभारले होते तेही प्रचंड बंदोबस्तात पाडण्यात आले. सुरुवातीला काही वेळ अतिक्रमण पाडण्यासाठी विरोध दर्शवून मुदतवाढ मागण्यात आली मात्र पथकाने कारवाईवर ठाम असल्याचे सांगत अतिक्रमण जमीनदोस्त केले.