6 तास धावल्याने मोनो रेल जळाली

0

मुंबई । चेंबूर स्थानकातून वडाळ्याच्या दिशेने निघालेल्या मोनोरेलला म्हैसूर कॉलनी स्थानकात 9 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनी आग लागली होती. या आगीत मोनोचे दोन डबे जळून खाक झाली, तर स्थानकाचेही मोठे नुकसान झाले. आगीच्या अंतरिम चौकशी अहवालानुसार मोनोरेलला आग लागण्याआधी ती रात्रभर फेर्‍या मारत होती. या फेर्‍या मोनोरेलच्या दुसर्‍या टप्प्यातील ’ट्रायल रन’साठी होत्या. रात्रभर मोनोच्या फेर्‍या सुरू असल्याने मोनो रेलचे डबे गरम होऊन स्पार्क होऊन त्यातून अचानक धूर येऊ लागला. धूर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न झाले. पण त्यासाठी आवश्यक आपत्कालीन यंत्रणाच कार्यान्वित न झाल्याने आग भडकली, असा प्राथमिक निष्कर्षही समितीने काढला आहे.

अंतिम अहवालाकडे लक्ष
एकूणच तांत्रिक चुका आणि मोनोच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे आग लागल्याचे अंतरिम अहवालातून समोर येत आहे. त्यामुळे आता अंतिम अहवाल काय येतो आणि त्यात कुणाला जबाबदार धरले जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच या पुढे अशा घटना घडू नये यासाठी ’एमएमआरडीए’ काय ठोस उपाययोजना करते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

मोनोरेल आगीप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाचे निवृत्त आयुक्त पी. एस. बाघेल यांच्या समितीने नुकताच यासंबंधीचा अंतरिम अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ला सादर केला आहे. डबे गरम झाल्याने मोनोला आग लागली आणि आग विझवण्यासाठीची आपत्कालीन यंत्रणा ऐनवेळी कुचकामी ठरल्याने आग भडकल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आगीमुळे मोनोरेलच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने ’एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त युपीएस मदान यांनी मोनोरेलची संपूर्ण चाचणी झाल्याशिवाय मोनो सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे अजूनही मोनोच्या चाचण्या आणि चौकशी सुरू आहे, तर पुढील आठवभरा तरी मोनोरेल सेवा बंदच राहण्याची शक्यता आहे.