6 ते 10 : नो कंडोम अ‍ॅड!

0

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची वाहिन्यांना सूचना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्हीवरील कंडोमच्या जाहिरातींसाठी वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे यापुढे वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान कंडोमच्या जाहिराती दाखवता येणार नाहीत. कंडोमच्या जाहिरातींमुळे मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबद्दलची सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांना दिली आहे. अशा जाहिरातींसाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. यानुसार, कंडोमच्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच टीव्हीवर दाखवता येणार आहेत. कंडोमच्या जाहिराती एका विशिष्ट वयोगटातील लोकांसाठी असून, त्या लहान मुलांसाठी नाहीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

लहान मुलांवरील परिणाम रोखणार
कंडोमच्या जाहिरातींसाठी सरकारने वाहिन्यांना पाठविलेल्या सूचनापत्रात काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. यानुसार, कंडोमच्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच टीव्हीवर दाखवता येतील. लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारे प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एडसला रोखण्यासाठी गर्भनिरोधक आणि कंडोमचा वापर करावा, अशी जनजागृती सरकारकडून केली जाते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत कंडोमचे वाटपदेखील केले जाते. मात्र लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम लक्षात घेत सरकारने या जाहिराती दाखविण्यावर निर्बंध आणल्याचे म्हटले आहे.

अश्लिलतेकडे झुकणार्‍या जाहिराती
कंडोमच्या जाहिराती एका विशिष्ट वयोगटातील लोकांसाठी असून, त्या लहान मुलांसाठी नाहीत, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वाहिन्यांना पाठविलेल्या सूचना पत्रातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुलांच्या सुरक्षेला धोका पोहोचू नये आणि शरीरासाठी हानीकारक असलेल्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधले जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने नमूद केले आहे. अश्लिलतेकडे झुकणार्‍या आणि मनात घृणा निर्माण करणार्‍या जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते, या नियमाचा आधार केंद्र सरकाने या बंदीसाठी घेतला आहे.