6 पुलांचे लोकार्पण; वाहतूक सुलभ

0

शहादा । तालुक्यात शहरी व ग्रामीण भागांना जोडणार्‍या महत्त्वपूर्ण सहा पुलांचे लोकार्पण झाल्याने दळणवळणाचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. हे सहाही पूल अत्यावश्यक होते. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात शहादा तालुक्यात सर्वाधिक लहान व मोठे पूल बांधण्यात आले आहेत. पूल नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता पूल उपलब्ध झाल्याने मोठी समस्या दूर झाली आहे. पुलांअभावी पावसाळ्यात नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत होती. परंतु, आता पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पुलांची कामे पूर्ण होऊन ते वाहतुकीसाठी खुले झाल्याने दळणदळण सुकर झाले आहे.

आमदार पाडवींना लाभले श्रेय
विशेष म्हणजे सहा पैकी चार पुलांचे लोकार्पण करण्याचे भाग्य तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांना लाभले आहे. सन 2006 मध्ये अतिवृष्टीत वाकी नदीवरील तीन पूल, परिवर्धा गावाला लागून असलेला पूल, फत्तेपूर-अमोदा गावाला जोडणारा पूल व कानडी-चिखली गावाला जोडणारा पूल, सुसरी नदीवरील सुलतानपूर-सुलवाडे गावाला जोडणारा व म्हसावद गावाला लागून असलेला कन्हेरी नदीवरील पूल पुरात वाहून गेले होते. आता सर्व पुलांची कामे झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यात वाहनधारकांना अडचण येणार नाही. शेतकरीवर्गाचा मोठा लाभ होणार आहे. पावसाळ्यात पुलांअभावी शेतकर्‍यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत होते.

सर्व पूल वाहतुकीसाठी खुले
वाकी नदीवर असलेला कानडी व चिखली गावाला जोडणारा लहान पूल 2006 मध्ये अतिवृष्टीत वाहून गेला होता. परिणामी दहा वर्षांपासून नागरिकांना दळणवळणासाठी त्रास होत होता. वहाने-कनसाईमार्गे 15 कि.मी. अंतर फिरुन म्हसावदमार्गे शहादा येथे जावे लागत असे. गेल्यावर्षी मोठा पूल बांधून कार्यान्वित करण्यात आला. सुलतानपूर सुलवाड्याला जोडणारा सुसरी नदीवर, आडगावजवळ वाकी नदीवर, गोदीपूर-ब्राम्हणपुरीला जोडणारा सुसरी नदीवर, लोणखेडा महाविद्यालय ते सूतगिरणीला जोडणारा सुसरी नदीवरील व आता शहादा शहर व पिंगाणे गावाला जोडणारा गोमाई नदीवर मोठा पूल, लोणखेडा महाविद्यालय ते लोणखेडा गावाला जोडणार्‍या जुन्या पुलाला लागून समांतर मोठा पूल बांधण्यात आला. सर्व पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.

दळणवळण झाले गतिमान
हे सर्व पूल दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पिंगाणे गावाजवळील पुलामुळे कुढावद, बोरद तसेच तळोदापर्यंत वाहनधारकांसाठी फायदेशीर ठरतो आहे. गोमाई नदीवरील लोणखेडा महाविद्यालयाला जोडणारा समांतर पूल विसरवाडी ते सेंधवापर्यंत काम सुरु असलेल्या राज्य मार्गाचा दृष्टीने फार लाभ दायक ठरणार आहे. सुलवाडे-सुलतानपूरला जोडणार्‍या पुलामुळे मध्यप्रदेशातील खेतिया भागातील वाहनधारकांना सरळ म्हसावदमार्गे धडगाव जाण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. ह्या सर्व पुलांची कामे शहादा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात आली आहेत.