मुंबई । अल्पवयीन मुली, महिलांवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग होण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिर्डीवरून मुंबईला परतणार्या दाम्पत्याच्या 6 वर्षांच्या मुलीवर 32 वर्षाच्या नराधमाने धावत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील मालाडमध्ये राहणारे दाम्पत्य त्यांच्या 2 लहान मुलांसह 3 दिवसांपूर्वी शिर्डीला गेले होते. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसमध्ये 13 जूनला संगमनेरमधून सोपान उगले बसमध्ये चढला. बसमध्ये सोपान उगले हा शेवटच्या आसनावर बसला होता. त्याचवेळी सोपानच्या बाजूला गेल्यावर पीडित मुलगी झोपून गेली. यानंतर सोपानने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बसमधून उतरल्यावर पीडित मुलीने तिला वेदना होत असल्याचे आईला सांगितले. यानंतर महिलेला मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यावर कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सोपान उगले याला अटक केली. सोपान उगले हा ‘बेस्ट’मध्ये चालक म्हणून काम करत असल्याचे समोर येत आहे.
शिर्डीवरून मुंबईत येत असताना 13 जून रोजी हा प्रकार घडला. या बसमध्ये संगमनेरवरून परतणारा उगले रात्री साडेदहाच्या सुमारास चढला. तो मागच्या सीटवर बसला. लहान मुलीची सीट खराब असल्याने तिला व्यवस्थित बसता येत नव्हते. रात्री तीनच्या सुमारास आईने तिला उगलेच्या शेजारील रिकाम्या सीटवर बसवले. सकाळी नेहा घरी पोहोचली. घरी आल्यावर ती घाबरलेली दिसली. याबाबत आईने तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा उगलेने रात्री तिच्या सोबत अश्लील चाळे केल्याचे सांगितले. या प्रकारामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी बस स्टॅन्डवर जाऊन बसचा शोध घेतला. त्यांना ती बस सापडली, मात्र उगले तेथे नव्हता. त्यांनी कुरार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या कक्ष 12ने संबंधित ट्रॅव्हल एजन्सीमधून उगलेची माहिती मिळवली. तो गोरेगाव बस डेपोमध्ये कार्यरत असल्याचे समजले. त्याच्या मोबाइल क्रमांकावरून त्याचे लोकेशन गोरेगाव असल्याचे तपास अधिकार्यांना समजले. त्यानुसार त्याला बेड्या ठोकल्या.