पुणे । ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. दौंड, भोर, मावळ या तीन तालुक्यातील एकूण ग्रामपंचायत सदस्यांचा त्यात समावेश आहे. ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असल्याने सदस्यत्व रद्द करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले होते. त्यानुसार पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
यांचे झाले सदस्यत्व रद्द
दौंड तालुक्यातील देवकरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य बबई मेमाणे, मंगल धुमाळ, शोभा कुसेकर, धोंडीबा केळकर, मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू शिंदे तर भोर तालुक्यातील भोंगवली ग्रामपंचायत सदस्य अंकुश शिरगावकर या सहा जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या सहा जणांविरोधात महाराष्ट्र ग्रापंचायत अधिनियम 1959 चे कलम 40 (1) नुसार कारवाई करून सदस्यतत्व करण्यात आले, असे संदिप कोहीणकर यांनी सांगितले.
जि. प. ने उगारला कारवाईचा बडगा
खडकाळा ग्रामपंचायत येथील सदस्य अभिमन्यू शिंदे हे गेल्या एक वर्षांपासून येरवडा कारागृहात असल्यामुळे सभांना गैरहजर आहेत. तर भोंगवली ग्रापंचापयतीचे सदस्य अंकुश शिरगावकर हे परदेशी गेल्यामुळे वर्षभर गैरहजर आहेत. या सर्व सदस्यांना त्यांच्या गैरहजेरीबाबतची विचारणा केली तसेच संधी देण्याच्या हेतूने सुनावणीही घेण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर यांनी
दिले आहे.