धुळे। शहरातील नकाणेरोड लगत असलेल्या साईदर्शन कॉलनी भागात एकाच रात्रीतून सहा ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली. चोरट्यांनी सहा ठिकाणी घरफोड्या करुन लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी लक्ष्य केलेली ही घरे मिलिट्रीत नोकरीला असलेल्या सैनिकांची आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. या घटनेने कॉलनी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, एकाच रात्रीतून सहा ठिकाणी घरफोड्या करुन चोरट्यांनी पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.
काही घरांची कुलुपे तोडली
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंगचे प्रकार घडत आहेत. या चोरट्यांचा शोध लागलेला नसतांनाच काल एकाच रात्रीतून चोरट्यांनी तब्बल सहा ठिकाणी घरफोड्या केल्यात. साईदर्शन कॉलनीतील रहिवासी रात्री घराच्या छतावर झोपलेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी या घरफोड्या केल्यात. योगेश काशिनाथ पाटील यांच्या घरातून 11 ग्रॅम सोन्याचे दागिने व 12 हजार रुपयांची रोकड, दगडू साहेबराव पाटील यांच्याकडे चोरीचा प्रयत्न, अमोल पवार यांच्या घरातून 4 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने, हर्षा विनायक पाटील यांच्या घरातून 4 ग्रॅम सोन्याचे दागिने व 6 हजारांची रोकड लंपास झाली असून प्रमोद शिवाजी देवरे हे बाहेर गावाला गेले असल्याने किती ऐवज चोरीला गेला हे अद्याप समजू शकलेले नाही. अन्य एका घरीही घरफोडी झाली आहे. एकूण लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज आहे. काही घरांचे कुलूप तोडण्यात आले तर काही घरांच्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला. या सर्व घरांमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले आहे. ही सर्वच घरे सैनिकांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सर्व घरफोडींची पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.