60 हजारांच्या मद्यासह गावठी कट्टा जप्त : पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई
वाहन सोडून गुजरातमधील अज्ञात चालक पसार ः आरोपीचा कसून शोध सुरू
भुसावळ/पिंपळनेर : पिंपळनेर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 60 हजार रुपये किंमतीचे अवैध मद्य जप्त व 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. पोलिसांना पाहताच आरोपीने पाच लाख रुपये किंमतीची स्वीप्ट कार सोडून पळ काढला. आरोपी चालक हा गुजरातमधील असल्याचा संशय असून त्याच्याविरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नाकाबंदीदरम्यान पोलिसांची कारवाई
पिंपळनेर पोलिसांनी नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ गावाजवळ नाकाबंदी लावली असताना शनिवार, 8 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नवापुरकडुन पिंपळनेरकडे येणारी स्वीप्ट कार (क्रमांक जी.जे. 02.ओ.सी. 4043) आल्यानंतर वाहन चालकाने काही अंतरावर वाहन सोडून पळ काढला. वाहनाची तपासणी केली असता त्या 25 हजार रुपये किंतीची गावठी बनावटीचा कट्टा व 58 हजार 560 रुपये किंमतीचा देशी-विदेशी कंपनीचा अवैध मद्यसाठा आढळला तसेच पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीची स्वीप्ट गाडी जप्त केली आहे. पोलिस नाईक दत्तु कोळी यांनी अज्ञात चालकाविरोधात फिर्याद दिल्यावरून पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे करीत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, नाईक दत्तू कोळी, नाईक हेमंत सोनवणे, नाईक जयकुमार, सोनवणे, नाईक विशाल मोहने, सोमनाथ पाटील, रवींद्र सूर्यवंशी, नरेंद्र परदेशी यांच्या पथकाने केली.