60 टक्क्यांपेक्षा कमी गुणधारकांचा प्रवेश अर्ज नाकारला

0

धुळे। देवपूरातील झेड.बी.पाटील महाविद्यालयात 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्जच न स्विकारण्याचा अलिखीत नियम घोषित झाला. एका जागरुक विद्यार्थीनीने ही तक्रार युवासेनेकडे करताच पंकज गोरे यांनी थेट प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये जात जाब विचारल्याने प्राचार्यांना माघार घेत सर्वच विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याचे फर्मान सोडावे लागले. बारावी निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्‍चित व्हावा म्हणून विद्यार्थ्यांसह पालक महाविद्यालयाची दारे झिजवित आहेत. त्यातच महाविद्यायात 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण असणार्‍यां विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जच देण्याचे धोरण स्वीकारले होते.

60 टक्क्याधारकांचा प्रवेश निश्‍चित
विद्यार्थ्यांना 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तर अर्जच न स्विकारण्याचा प्रकार झेड.बी.पाटील महाविद्यालयात सुरु होता. त्याचवेळी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असतील तर त्या विद्यार्थ्यांना तात्काळ फी भरण्याचे चलन देवून त्यांचे प्रवेश निश्‍चित केले जात होते. एकीकडे गुणवत्ता यादीचे कारण सांगतांनाच दुसरीकडे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्जच न स्विकारण्याचे धोरण झेड.बी.पाटील महाविद्यालयात अवलंबिण्यात आले होते.

विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान
सुरुवातीचे दोन दिवस ज्या विद्यार्थी आणि पालकांना झेड.बी.पाटील महाविद्यलयातून अर्ज दाखल न करताच परतावे लागले होते. त्यांना नव्याने संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. विद्यार्थींनीने जागरूकता दाखविल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवेश अर्ज सर्वच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण आवश्यक असतांना 60 टक्केची अट ठेवून महाविद्यालय एक प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय करीत होते. युवासेनेच्या भूमिकेने कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला
आहे.

सेने स्टाईलने विचारला जाब
हा प्रकार सुरू असतांना या प्रकाराची एका जागरुक विद्यार्थीनीने युवासेनेचे पंकज गोरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनीही तत्काळ दखल घेत थेट प्राचार्यांची कॅबिन गाठून त्यांना जाब विचारला. सुरुवातीला असे काही होत नाही म्हणून टाळाटाळ करणार्‍या प्राचार्यांना पंकज गोरे यांनी शिवसेना स्टाईलने जाब विचारताच ते सर्वच अर्ज स्विकारण्यास तयार झाले. तसे तोंडी फर्मानही त्यांनी संबंधितांना काढले.