600 कलाकारांची भाजपाविरुध्द मोहिम

0

नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहांसह 600 कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. या कलाकारांनी एक पत्रक जारी केले असून भारतीय संविधान धोक्यात आहे. भाजपला मतदान करू नका, असे या पत्रात म्हटले आहे.

त्यावर नसिरुद्दीन शहा यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अनुराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या सह्या आहेत. 12 भाषांमध्ये हे पत्र तयार करण्यात आले असून आर्टिस्ट यूनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आले आहे. सध्याची लोकसभा निवडणूक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आज गीत, नृत्य, हास्यही धोक्यात आहे. आपलं आगळंवेगळं संविधानही धोक्यात आहे. ज्या ठिकाणी तर्क, चर्चा आणि असहमतींना वाव दिला जातो, अशा संस्था, यंत्रणांचा गळा घोटण्यात आला आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोणतीही लोकशाही प्रश्न, चर्चा आणि दक्ष विरोधी पक्षांशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही. मात्र सध्याच्या सरकारनं या सर्व गोष्टी पायदळी तुडविल्या आहेत. त्यामुळेच सर्वांनी भाजपला सत्तेतून हाकलण्यासाठी मतदान करायला हवे. कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून घालवा, संविधान वाचवा, असे आवाहनही या पत्रातून करण्यात आले आहे.