जळगाव । फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2017 स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सहाशे शाळांमध्ये प्रत्येकी पाच याप्रमाणे तीन हजार फुटबॉलचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धांच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण तयार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2017 अंतर्गत महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन फुटबॉल या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह रोटरी, लायन्स क्लब शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी तसेच शारिरीक शिक्षक उपस्थित होते. भारतात 6 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत 17 वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने ‘मन की बात’ या कार्यक्रमांत फुटबॉल या खेळास संपूर्ण देशात प्राधान्य देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यानुसार राज्यातील 20 हजार शाळात प्रत्येकी पाच याप्रमाणे फुटबॉलचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे. स्ट्रीट फुटबॉल खेळणे, सनडे फुटबॉल डे म्हणून साजरा करणे, सेल्फी पॉईंट निश्चित करणे, विविध शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यात फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे, चित्ररथ रॅलीचे आयोजन करणे, फुटबॉल गॅस बलुन आकाशात सोडण्यात येणार असून 29 ऑगस्ट रोजी फुटबॉल महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. या स्पर्धेच्या प्रसारासाठी सर्व शाळा, महाविद्यालये तसेच सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घेऊन जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण तयार करुन आरोग्यदायी व निरामय वातावरण तयार होण्यास सर्वांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.