624 हेक्टर्स क्षेत्रात फळबाग लागवडीचे उद्दीष्ट

0

शिंदखेडा । धुळे जिल्ह्यात रोजगार हमी योजने अंतर्गत 624 हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवडीचे उद्दीष्ट येत्या वर्षात निश्‍चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक फळबाग लागवड धुळे तालुक्यात तर कमी लागवड शिंदखेडा तालुक्यात होते. चिकु या फळाची लागवड साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात होतच नाही. जिल्ह्यामध्ये खरीप पिकांसोबतच फळ लागवडीचे देखील नियोजन कृषी विभागातून करण्यात येत आहे. हवामान खात्याने पाऊस लवकर येण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्‍यांसह कृषी विभागाने देखील कंबर कसली आहे. कमी पाऊस होत असला तरी जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झालेली असल्याने फळबाग लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे.

झाडांची जोपासना करण्यासाठी कसरत
फळबाग लागवडीत झाडांची जोपासना करण्यासाठी कसरत करावी लागते. परंतु इतर पिकांपेक्षा लागवड खर्च कमी आहे व उत्पन्न समाधानकारक मिळत असल्याने शेतकरी फळझाड लागवड करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी शेतकरी कृषी विभागाची मदत घेतांना दिसतात. फळबाग लागवडीसाठी रोप कृषीविभाग निर्धारीत केलेल्या शासकीय किंवा शासनमान्य रोपवाटीकेतून रोप उपलब्ध होतात. नऊ रुपयांपासून 50-60 रूपयांपर्यंत रोपाची किंमत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 20 रोपवाटीका आहेत. या फळबाग लागवडीत डाळींब, पेरू, लिंबू, सिताफळ, मोसंबी, आवळा, बोर, आंबा आणि चिकू या फळझाडांची लागवड करण्यात येते. चिकू या फळझाडाची लागवड साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांमध्ये होत नाही तर मोसंबीची लागवड साक्री व शिंदखेडा तालुक्यात दिसून येत नाही.

डाळींबावर जास्तीत जास्त भर
धुळे तालुक्यात डाळींब (97 हे.), पेरू (13 हे.) लिंबू (130 हे.), सिताफळ (26 हे.), मोसंबी (2 हे.), आवळा (4 हे.), बोर (29 हे.), आंबा (2 हे.), चिंकू (7.50 हे.) अशा एकूण 310.50 हे. क्षेत्रात फळबाग लक्षांक प्रस्तावित करण्यात आले आहे. साक्री तालुक्यात डाळींब (40 हे.), पेरू (5 हे.), लिंबू (10 हे.), सिताफळ (10 हे.), आवळा व बोर (प्रत्येकी 5 हे .) लागवडीचे उद्दीष्ट आहे. शिंदखेडा तालुक्यात डाळींब (10 हे.), पेरू (10 हे.) लिंबू (60 हे.), बोर (20 हे.) असे एकूण शंभर हेक्टर क्षेत्रात उद्दीष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी
शिरपूर तालुक्यात डाळींब (18 हे.), पेरू (17 हे.) लिंबू (34 हे.), सिताफळ (16 हे.), मोसंबी (15 हे.), आवळा (5 हे.), बोर (2 हे.), आंबा (1 हे.), असे एकूण 108 हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवडीचे उद्दीष्ट प्रस्तावित करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात 634.50 हेक्टर क्षेत्रात विविध फळबागांचे उद्दीष्ट प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात डाळींब (165 हे.), पेरू (45 हे.) लिंबू (234 हे.), सिताफळ (52 हे.), मोसंबी (17 हे.), आवळा (14 हे.), बोर (56 हे.), आंबा (48 हे.), (चिकू 7.50 हे.) या फळ पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधीक लिंबू फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तर सर्वाधीक कमी चिकू फळझाडाची लागवड होते. खरीप हंगामाची तयारी शेतकरी पूर्ण करीत आहे.