आरपीएफची धडक कारवाई मोहीम जळगावात टाकला छापा ; जंक्शनवरील दलालांच्या मुसक्या आवळण्याची गरज
भुसावळ- भुसावळ विभागात मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या आरक्षीत तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचे समोर येत आहे.यामूळे रेल्वेच्या सुरक्षा बलाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.यामध्ये दोन दिवसापुर्वी विदर्भातील अकोला येथे छापा टाकून तिन जणांना अटक केली.तर शनिवारी जळगावातील एका टुर्स आणि ट्रॅव्हलसच्या एजन्सीवर छापा टाकून एकास 64 हजार रूपयाच्या आरक्षीत तिकिटांसह अटक केली.रेल्वे सुरक्षा बलाच्या या कारवाईने तिकिटांचा काळाबाजार करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
दोन दिवसात चार जणांवर कारवाई
रेल्वे तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असून सर्वसामान्य प्रवाशांना आरक्षीत तिकिट मिळणे कठीण होवून जाते.यामूळे प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजून काळ्या बाजारातून तिकिट खरेदी करावे लागते.जास्तीचे पैसे मिळत असल्याने भुसावळ रेल्वे विभागात दलाल मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत.याबाबत रेल्वेच्या सुरक्षा बलाकडे तक्रारी वाढल्या होत्या.याची दखल घेवून रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वेच्या आरक्षीत तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष अभियान हाती घेतले असून यासाठी स्वंतत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय वरीष्ठ आयुक्त अजय कुमार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पथकातील निरीक्षक प्रविणकुमार कस्बे,अंबिका यादव,समाधान वाव्हूलकर,संजीव राय,मिलींद तायडे,प्रधान आरक्षक मनीष शर्मा,विनोद जेठवे यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे जळगाव येथील ओम शिवशक्ती टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सवर शनिवारी छापा टाकला.यामध्ये अवैधरीत्या 30 ई-तिकिट व 10 काऊंटर असे 40तिकिटे आढळून आली.या तिकिटांची किंमत 64 हजार 484 असून याप्रकरणी ट्रॅव्हल्स दुकान मालक राजेश देवराम सोनवणे (वय-35)याला अटक करण्यात आली.शिवाय,दुकानातून संगणक आणि प्रिंटरही जप्त करण्यात आले असून दोन दिवसापुर्वीही विदर्भातील अकोला येथे छापा टाकून तिन जणांना अटक केली असल्याची माहीती वरीष्ठ सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
दलालांमध्ये खळबळ
रेल्वे सुरक्षा बलाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मोहीमेमूळे तिकिटांचा काळाबाजार करणार्या दलांलामध्ये खळबळ उडाली आहे.शिवाय,तिकिट आरक्षण कार्यालयातील कर्मचार्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वेच जंक्शन स्थानक असलेल्या भुसावळ शहरातही धडक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
आरक्षण कार्यालयावरही नजर
भुसावळातील रेल्वच्या आरक्षण कार्यालयासमोर दलालांचा नेहमी वावर असल्याचे दिसुन येते.यामूळे सुरक्षा बलाने आरक्षण तिकिट कार्यालयावरही करडी नजर ठेवणे गरजेचे झाले आहे. भुसावळात धडक कारवाई केल्यास मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.