65 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

0

जिल्ह्यात 964 पैकी 201 कामे पूर्ण; 70 टक्के सर्वेक्षण पूर्ण

पुणे : जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 65 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर करून, त्याची अंमलबजावणीसाठी अधिकार्‍यांनी कंबर कसत कामांना सुरुवात केली आहे. प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवून निविदा प्रक्रियांसह तत्काळ काम सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यात 70 सर्वेक्षण करून 964 योजना योग्य असल्याचा निष्कर्ष निघाला, तर अद्याप उर्वरित सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये 964 पैकी 201 कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ‘टंचाई कक्ष’ सुरू

जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये पाणी आणि चारा टंचाईची भीषणता लक्षात घेता आणि पुढील पाऊस सुरू होईपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी टंचाई कक्ष सुरू करण्यात आला. जेणेकरून त्याद्वारे वेगवेगळ्या विभागांकडे असलेल्या टंचाईच्या कामांची एकत्रित माहिती मिळू शकेल. कमी पडत असलेल्या विभागांना तत्काळ सूचना करता येणे शक्य होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी या कक्षाची स्थापना केली.

दरम्यान, मंजूर केलेल्या आराखड्यात 2 हजार, 718 योजना तयार करण्यात आल्या. सर्वेक्षणाअंती त्यापैकी 964 योजना योग्य ठरल्या. त्यासाठी 23 कोटी, 82 लाखांचा निधी लागणार आहे. आतापर्यंत 75 टक्के सर्वेक्षण झाले असून, उर्वरित सर्व्हेक्षण पूर्ण करून योजना राबविण्यात येणार आहे.

878 योजनांना प्रशासकीय मान्यता

आतापर्यंत योग्य ठरलेल्या योजनांपैकी 878 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्याला 21 कोटी, 74 लाख खर्च होणार आहे. तर, आतापर्यंत 813 निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून 65 निविदा प्रक्रिया सुरू आहेत. यापैकी 657 कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, 201 कामे पूर्ण झाली आहेत. तर, 456 कामे प्रगतीपथावर आहेत. आराखड्यानुसार आतापर्यंत 131 विंधन विहिरी पूर्ण झाल्या असून 83 प्रगतीपथावर आहेत. नळ योजनांची विशेष दुरुस्तीमध्ये 135 निविदा असून त्यापैकी 74 निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्याच्या कामांचे आदेश देणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यात आतापर्यंत 10 विहिरींचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे.

पुरवणी आराखडा तयार केला

जिल्ह्यातील टंचाईची भीषणता लक्षात घेता यावर्षी लवकर टंचाई आराखडा तयार करण्यात आला. तसेच तालुक्यातील समस्या आण अडचणीही मागवण्यात आल्या. त्यानुसार पुरवणी आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाई आराखड्याअंतर्गत असलेली सर्व कामे मार्च 2019च्या आत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी सांगितले.