कलाकारांची भूमिका रास्त

0

प्रदीप चव्हाण- नवी दिल्लीतील विज्ञाना भवनात गुरुवारी ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. मात्र पुरस्कार वितरणाआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याचे कळताच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरुपात ११ कलाकारांना सन्मानित करणार होते. त्यानंतरच्या पुरस्काराचे वितरण माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार होते.

ही बाब पुरस्कार्थी कलाकारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विरोध केला. त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्तेच पुरस्कार स्वीकारण्याचा हट्ट धरला. कला क्षेत्रातील दिग्गजांनी देखील कलाकारांच्या या भूमिकेला सहमती दर्शविली नाही. मग त्यात मराठी सिने क्षेत्रातील बाप माणूस म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर असतील, विक्रम गोखले असतील यांनी कलाकारांच्या या भूमिकेला असहमती दर्शविली. कलाकारांचे असे वागणे योग्य नसल्याची टिप्पणी त्यांनी केली. परंतु एका बाजूने विचार केल्यास कलाकारांनी घेतलेली भूमिका ही योग्य व रास्तच होती. 

सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा वाढलेली असल्याने साहजिकच चित्रपट सृष्टीत देखील खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एखादा चित्रपट करतांना निर्मंता, दिग्दर्शकाला खूप मेहनत घ्यावी लागते. सेन्सॉर बोर्डाचे अनेक नियम आज आहे त्याचा विचार करत विरोध होणार नाही किंवा टीकेला सामोरे जावे लागेल असे काही चित्रपटात असू नये  याचा विचार करून अधिकाधिक चांगला देण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट जरी अडीच तीन तासाचा असला तरी त्यामागील मेहनत हे वर्ष किंवा दोन वर्षापेक्षाही अधिक असते. अनेक अडचणीचा सामना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत करावा लागतो. सर्व खाच खळगे पार करावे लागतात. चित्रपट करतांना समाजात आपला गौरव व्हावा ही अपेक्षा  प्रत्येक कलाकाराची तसेच चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील घटकाची असते. आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा असते.त्यामुळे एखाद्या चित्रपटाला पुरस्कार जाहीर होणे ही बाब सामान्य नसते. त्यामागे खूप मेहनत तसेच  जिद्द असते. त्यात एखादा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्यावर पुरस्कार्थीच्या आनंदाला पारावर नसते.

एखादा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार म्हटल्यावर ‘सोनेपे सुहागा; अशी गोष्ट झाली. मग ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना देखील तोच आनंद होता. राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरव होणार ही बाब या कलाकारांसाठी फार महत्वाची होती. परंपरेप्रमाणे राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार मिळतो म्हणून त्यांची ही अपेक्षा होती. कलाकारांच्या या अपेक्षेत काय गैर होते?

राष्ट्रपती देशाचे सर्वेसर्वा आहेत, देशाचे प्रथम  नागरिक आहेत त्यामुळे त्यांचा वेळापत्रक व्यस्त असणार यात दुमत असूच शकत नाही.  परंतु या  पुरस्कारासाठी त्यांनी  वेळ आरक्षित ठेवायला हवा होता आणि जर कालचा वेळापत्रकानुसार राष्ट्रपती उपस्थित राहू शकत नव्हते तर पुरस्कार वितरण पुढील राखीव वेळेच्या नियोजनानुसार ठेवण कलाकारांना अपेक्षित होते.