66 वस्तूंवरील जीएसटी करात कपात

0

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषदेने आज झालेल्या बैठकीत 66 वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल करून तो कमी करण्याचा निर्णय घेतला. जीएसटी करात कपात करण्यासाठी केंद्र सरकारकडे एकूण 133 वस्तूंची यादी आली होती. त्यापैकी 66 वस्तूंवरील जीएसटी करात कपात करण्यात आली आहे. यात शेतीसाठी उपयोगी ट्रॅक्टर आणि त्यासंबंधीच्या वस्तूंवरील जीएसटी करात कपात करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यात आला आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

कॉम्प्युटर प्रिंटरवरही 28 ऐवजी 18 टक्के कर लागणार आहे. काजूवर 18 ऐवजी 12 टक्के कर लागेल. इन्शुलिनवर 12 ऐवजी 5 टक्के कर लागणार आहे. उदबत्तीवरचा करही 12 वरून 5 टक्के करण्यात आला आहे. ज्या सिनेमागृहांमध्ये सिनेमाचे तिकीट 100 रुपयांपेक्षा कमी आहे त्या तिकीटांवर 28 ऐवजी 18 टक्के, तर 100 रुपयांपेक्षा जास्त तिकीटदर असलेल्या तिकिटांवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे तसेच जीएसटी परिषदेची पुढची बैठक पुढच्या रविवारी अर्थात 18 जूनला होणार आहे असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

सॅनिटरी नॅपकिनवरील कर कायम
महाराष्ट्रासह देशभरात सॅनिटरी नॅपकिन जीएसटी करातून वगळावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी सोशल मिडीयातूनही मोहीम उघडण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी आंदोलनेही झाली. मात्र, सॅनिटरी नॅपकिन जीएसटी करामधून मुक्त करणे दूरच, त्या करांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. सॅनिटरी नॅपकिनवर कर लावूच नये, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. मात्र, या करासंदर्भात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.