चाकडू ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरण ; अटकेतील आरोपींची संख्या चार
शिरपूर- तालुक्यातील चाकडू ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत अभियानासह ग्रामस्वच्छता निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अफरातफर केल्याप्रकरणी 26 जून 2018 रोजी सरपंचासह ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सरपंच ठुमाबाई सुक्राम पावरा व ग्रामसेवक रवींद्र नथ्थू तमखाने यांना धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती तर 28 रोजी रात्री पुन्हा सरपंच ठुमाबाई पावरा यांचे पती सुक्राम पावरा व अंतुर्लीचे माजी उपसरपंच प्रवीण शिरसाठ यांना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा अटक केल्याने ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघा आरोपींना मंगळवारी शिरपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आर्थिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
ग्रामपंचायतीतील तब्बल 67 लाखांच्या अपहाराचा तपास धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला. सरपंच अशिक्षीत असल्याचा फायदा त्यांच्या पतीने घेतला तसेच याकामी त्यांचा मित्र तथा माजी उपसरपंच प्रवीण शिरसाठ यानेही मदत केल्याचे आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सुरुवातीला दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तर सरपंच ठुमाबाई पावरा यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती तर अन्य दुसरा संशयीत ग्रामसेवक रवींद्र तमखाने याची 30 रोजी पोलिस कोठडी संपत असल्याने त्यास बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवारी रात्री अटक केलेल्या सुक्राम पावरा व प्रवीण शिरसाठ यांना मंगळवारी शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.