पुणे । पुणे जिल्ह्यातील 676 अंगणवाड्यांची पहिल्यांदाच दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी 5 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रथमच अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अंगणवाड्यांचे बांधकाम झाल्यापासून त्या दुरुस्त करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक अंगणवाड्यांची पडझड झाली होती. तसेच पावसाळ्याच्या दिवसात मुलांना अंगणवाडीत बसणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेने अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांनी दिली. अंगणवाड्यांची दुरुस्ती तसेच शौचालयाच्या बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्यातील 45, बारामती 87, भोर 40, दौंड 40, हवेली 47, इंदापूर, 49, जुन्नर 84, खेड 88, मावळ 49, मुळशी 18, पुरंदर 42, शिरुर 37, वेल्हे तालुक्यातील 50 अंगणवाड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे़ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रथमच अंगणवाड्यांची दुरुस्ती केली जाणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
नवीन अंगणवाड्यांसाठी 5 कोटी
सन 2017- 18 मधील 91 नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामांसाठी 5 कोटी 46 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची कामेही लवकरच सुरू होतील. आंबेगाव तालुक्यात 10, बारामती 16, भोर 6, दौंड 6, हवेली 6, इंदापूर 10, जुन्नर 10, खेड 9, मावळ 6, मुळशी 1, पुरंदर 3, शिरुर 7, वेल्हे 1 अशा 91 अंगणवाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत़