मुंबई (ब्रम्हा चट्टे)। आमदार आणि खासदार निधीच्या निधीतून करण्यात येणारी कामे, मंजूर रक्कम, आमदार-खासदारांच्या शिफरशींची पत्रे तसेच करण्यात येणार्या कामासंबधीच्या टेंडर प्रक्रियेची सर्व माहिती जिल्ह्याच्या संकेततस्थळावर टाकण्यात यावी, असे आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी आमदार, खासदार निधीतून करण्यात येणार्या कामांसंबंधीच्या सर्व रकमा 2 लाख 99 हजार दर्शविल्या होत्या. सर्व कामांसंबंधी सारखीच रक्कम कशी काय, असा प्रश्न मुंबईतील माहिती कार्यकर्ते भास्कर प्रभू यांनी माहिती अधिकारात उपस्थित केला होता. त्यासंबंधीची सुनावाई राज्य माहिती आयोगात झाली, त्यानंतर मुख्य माहिती आयुक्तांनी वरील आदेश जारी केले.
यापुढे नीधी खर्चाचे विवरण संकेतस्थळावर द्यावे लागणार
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांनी यापुढे आपापल्या विभागाच्या संकेतस्थळावर आमदार व खासदार निधी कार्यक्रमाबाबतची संपूर्ण माहिती दोन भागात द्यावी लागणार आहे. प्रत्येक कामांच्या जागांवरील तपशिल, आमदार व खासदारांचे पत्र, प्रशासकीय मंजूरी, कार्यान्वयीन यंत्रणा, मंजूर रक्कम, वितरीत रक्कम अशी माहिती एका पत्रात द्यावी लागणार आहे. दुसर्या पत्रात योजनांच्या टेंडरींग बाबतची सर्व माहिती द्यायची आहे. ज्यामध्ये काढण्यात आलेले टेंडर व त्यानुसार देण्यात आलेले कंत्राट, कंत्राटदाराचे नाव, कामांची रक्कम, कामाची प्रगती अशी माहिती सादर करायची आहे. सदर माहिती प्रत्येक महिन्यात अद्ययावत करुन संकेतस्थळावर टाकायची आहे. तसेच कामांचा निरिक्षण अहवाल देखील संकेतस्थळावर ठेवण्यात यावा असे सर्व जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या आदेशात म्हटलेले आहे.
पंधरा दिवसात माहिती अद्ययवत माहिती देण्याचे आदेश
2013 पासूनच्या आमदार व खासदार निधीच्या कामांची माहिती अद्ययावत करुन पंधरा दिवसात संकेतस्थळावर टाकण्याचे अपिलीय सुनावणीत मुख्य माहिती आयुक्तांनी मुंबई शहर जिल्हाधिकार्यांना दिले. यापूर्वी आमदार, खासदार निधीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालये देत होती. मात्र केवळ मंजूर रकमा सादर केल्या जात होत्या. मुख्य माहिती आयुक्तांच्या या आदेशाने लोकप्रतिनिधींच्या निधीतून राबवण्यात येणारी टेंडर प्रक्रियांची माहिती आता सर्वांनाच संकेतस्थळावर उपलबध होणार आहे.