7 खासदार, 98 आमदार प्राप्तिकरच्या रडारवर!

0

बेहिशेबी मालमत्ताप्रकरण

नवी दिल्ली : निवडून आल्यानंतर पाचवर्षांत उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याच्या संशयावरुन लोकसभेचे 7 खासदार आणि देशभरातील 98 आमदार प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. या खासदार, आमदारांच्या संपत्तीत झालेल्या बेहिशोबी वाढीची चौकशी सुरु आहे, अशी माहिती सोमवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) सर्वोच्च न्यायालयाला दिली. या खासदार, आमदारांची यादी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये कोणकोणत्या राजकीय नेत्यांची नावे आहेत, हे त्यानंतर समजणार असल्याने राजकीय वर्तुळात कमालीचे अस्वस्थ वातावरण आहे.

संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे निष्पन्न
एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, संपत्तीत वाढ झालेल्या लोकप्रतिनिधींची माहिती देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला खडेबोल सुनावले होते. या प्रकरणात सरकारच्या चालढकल करण्याच्या प्रवृत्तीवर न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. दोन निवडणुकींच्यादरम्यान ज्या नेत्यांची संपत्ती 500 पटीने वाढली आहे, त्यांच्यावर सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणाही न्यायालयाने केली होती. त्यानंतर तातडीने ही माहिती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. संपत्तीत बेहिशेबी वाढ झालेल्या खासदार आणि आमदारांची यादी बंद लिफाफ्यातून सीबीडीटी न्यायालयात मंगळवारी सादर करणार आहे. प्राप्तिकर विभागाकडून संबंधित लोकप्रतिनिधींच्या संपत्तीचा प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. लोकसभेच्या खासदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे तपासातून समोर आहे, असे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.

तपास अंतिम टप्प्यात
लखनऊमधील लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेने लोकसभेच्या 26, राज्यसभेच्या 11 खासदारांच्या आणि देशभरातील 257 आमदारांच्या संपत्तीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप केला होता. निवडणुकीआधी राजकीय नेत्यांकडून निवडणूक आयोगाला दिल्या जाणार्‍या संपत्तीच्या माहितीच्या (शपथपत्र) आधारे स्वयंसेवी संस्थेकडून हा आरोप केला होता. या आरोपांनंतर प्राप्तिकर विभागाने प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. या चौकशीची माहिती सीबीडीटीने सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी दिली. लोकसभेतील 9, राज्यसभेतील 11 सदस्यांची आणि देशभरातील 42 आमदारांच्या संपत्तीचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचेही सीबीडीटीने सांगितले.