7 दिवसांमध्ये राजीनामा द्या, अन्यथा…

0

इस्लामाबाद । पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशन, लाहोर उच्च न्यायालय बार ओसिएशन यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 7 दिवसांमध्ये सत्ता सोडा किंवा देशव्यापी आंदोलनाचा सामना करा, असा इशारा दिला आहे. दोन्ही बार असोसिएशनने संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. पनामा पेपर्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असे बार असोसिएशनने म्हटले आहे. पनामा गेट प्रकरणात शरीफ आणि त्यांच्या मुलांनी आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार केल्यामुळे संयुक्त चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे या दोन्ही बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे समर्थक वकील आणि दोन्ही बार असोसिएशनच्या सदस्यांमध्ये 19 मे रोजी झालेल्या वकिलांच्या एका सभेत हाणामारी झाली होती. नवाझ यांच्या समर्थक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष रशिद रज्वी यांना लाहोर उच्च न्यायालयाच्या ग्रंथालयात बंद केले होते. या गोंधळादरम्यान ग्रंथालयाच्या दरवाजाचे टाळे तोडून रशीद यांना बाहेर काढण्यात आले होते. या सभेनंतर नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा निर्णय दोन्ही बार असोसिएशनच्या वकिलांनी घेतला. पनामा पेपर्स प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्यामुळे शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे असल्याचे पीएमएल-एन समर्थक वकिलांचे म्हणणे आहे.