पुणे । महावितरणच्या सेंट मेरी उपविभाग अंतर्गत 7709 वीजग्राहकांना ऑगस्ट महिन्याचे शून्य युनिटचे वीजबिल दिल्याप्रकरणी ‘जी नेक्स्ट सोल्यूशन’ या मीटर रिडिंग एजन्सीविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महावितरणकडून फौजदारी तक्रार करण्यात आली आहे. या वीजग्राहकांना ऑगस्टची वीजबिले सप्टेंबरच्या वीजबिलात दुरुस्त करून देण्यात येणार असून त्याचा कोणताही वेगळा आर्थिक भुर्दंड वीजग्राहकांवर पडणार नाही अशी ग्वाही महावितरणकडून देण्यात येत आहे.
रास्तापेठ विभागांतर्गत लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखे विहार रोड परिसरातील वीजग्राहकांच्या मीटरचे रिडींग घेण्याचे काम भोसरीतील ‘जी नेक्स्ट टेक सोल्यूशन’ या एजन्सीला देण्यात आलेले आहे. परंतु ऑगस्ट, 2017च्या बिलासाठी मीटर रिडींगच्या कामामध्ये या एजन्सीने हेतुपुरस्सर चुका केल्याचे दिसून आले. त्यामुळे लुल्लानगर, नेताजीनगर, साळुंखे विहार रोड, समता कॉलनी, कुबेरा पार्क, सिंध हिंद कॉलनी, केदारी नगर, इथोपिया सोसायटी, गंगा सॅटेलाइट सोसायटी, ग्रीन व्हॅली या परिसरातील 7709 वीजग्राहकांनी शून्य युनिटचे देण्यात आले आहे. महावितरणचे 1 कोटी 72 लाखांचा महसूल बुडाला आहे. संबंधित वीजग्राहकांना चुकीच्या वीजबिलांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणने याची गंभीर दखल घेऊन कंपनीला या मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
तसेच मीटर रिडींग एजन्सीच्या चुकीमुळे ज्या 7709 वीजग्राहकांनी शून्य युनिट वापराचे वीजबिल देण्यात आले त्यांना सप्टेंबरमध्ये योग्य वीजवापराचे वीजबिल देण्यात येणार आहे. या वीजबिलांच्या दुरुस्तीमध्ये संबंधित वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारे वेगळा आर्थिक भुर्दंड पडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.