धुळे । गेल्या 30 वर्षांपासून मील परिसरातील सर्व्हे नं. 531 येथे वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी आज सातबारा उतारा मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकार्यांसह आयुक्तांना निवेदन देण्यात आले. मील परिसरातील सर्व्हे नं. 531 ही जागा शासकीय मालकीची असली तरी गेल्या 30 वर्षांपासून आम्ही तेथे वास्तव्याला आहोत. विशेष म्हणजे, सर्व लोक गरीब कुटूंबातील असून हातमजूरी करून उदर निर्वाह करतात. या भागात मनपाने रस्ते, वीज स्वच्छतागृहाची सुविधाही पुरविली आहे. कालपरत्वे परिवार वाढत असून या ठिकाणी वाढीव बांधकाम किंवा निवासाचा पुरावा देण्यासाठी ही जागा उपयोगी पडत नसल्याने आम्हाला याठिकाणचा आमच्या मालकीचा सातबारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मोर्चात लोकसंग्रामचे छोटु गवळी, लोटन मिस्तरी, नितेश राजपुत, जयदीप हेमाडे, विलास मराठे, अलका मोरे, मोहिनी बडगुजर, रेखा जाधव, राजेश संदानशिव, दिलीप जाधव, दत्तात्रय पवार, संजय अहिरे, सिंधुबाई पाटील, सुनिता नेतकर, दत्तात्रय पवार यांनी सहभाग नोंदवला.