रोहिंग्यांच्या स्थितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना ७ वर्षाचा कारावास

0

यांगोन- गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. दरम्यान रोहिंग्यांच्या स्थितीबद्दल वार्तांकन करणाऱ्या रॉयटर्स समूहाच्या दोन पत्रकारांना 7 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. कार्यालयीन गुप्तता कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आज यांगोन येथील न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली.

वा लोन (32) आणि क्याव सोए ऊ (28) अशी त्या दोघांची नावे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते. कारावासाची शिक्षा सुनावल्यावर क्याव याने आपण दोघेही निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आणि या निर्णयाने धक्का बसला नाही असे सांगितले.

या दोघांना ज्या कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे तो कायदा ब्रिटिशांनी वसाहतीच्या काळात तयार केला होता. यामध्ये जास्तीतजास्त 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. गेल्या सोमवारीच या दोघांच्या खटल्याचा निर्णय येणार होता मात्र न्यायाधीशांनी आपण आजारी असल्यामुळे न्यायालयात येऊ शकत नाही असे सांगून एक आठवडा निर्णय पुढे ढकलला होता.