वाकड पोलिसांचे 350 सोसायट्यांमध्ये ‘जागते रहो’ अभियान
वाकड : वाकड पोलिसांनी बुधवारी पहाटे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 350 सोसायट्यांमध्ये अचानक भेट दिली. यावेळी पोलिसांनी वसाहतींच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी सुमारे 70 टक्के सोसायट्यांमधील सुरक्षा रक्षक झोपलेले आढळून आले. हे अभियान पहाटे अडीच ते चार या वेळेत राबविण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात महाराष्ट्रासह भारताच्या विविध भागातून नोकरी, व्यवसायानिमित्त लोक आलेले आहेत. दिवाळीसाठी बहुतांश लोक आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे सोसायट्यांमधील अनेक फ्लॅट बंद असतात. सोसायटींना सुरक्षारक्षक असूनही अनेक सोसायट्यांमध्ये एकाच रात्रीत अनेक फ्लॅटमध्ये चोरी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोसायटींमधील सुरक्षारक्षक किती सतर्क आहे याचा आढावा वाकड पोलिसांनी बुधवारी पहाटे घेतला.
सुरक्षा एजन्सीला माहिती देणार
पहाटे दोन वाजता वाकड पोलिस ठाण्यातील 70 पोलिसांना नियोजनाप्रमाणे वाकड पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, उपनिरीक्षक हरीष माने यांनी कर्मचार्यांना सूचना देऊन एकूण 35 पथके तयार केली. प्रत्येक पथकाला नियोजनानुसार दहा सोसायट्यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सोसायट्यांमध्ये जाऊन तपासणी केली.
पोलिसांनी वाकड परिसरातील सुमारे 350 सोसायट्यांना भेट दिली. त्यातील जवळपास 70 टक्क्यांहून अधिक सुरक्षारक्षक गाढ झोपलेले आढळून आले. तपासणीसाठी गेलेल्या पोलिसांनी झोपलेल्या सुरक्षा रक्षकाचे फोटोही काढले. पोलिसांनी काढलेले झोपलेल्या सुरक्षारक्षकांचे फोटो आणि एक पत्र संबंधित सोसायटी आणि सुरक्षा एजन्सीला देण्यात येणार आहे.