भुसावळ । रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासंदर्भात डीआरएम आर.के.यादव यांनी शुक्रवारी भुसावळ विभागातील तिकीट चेकींग स्टाफची बैठक घेतली. त्यात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासंदर्भात तसेच विनापरवाना रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थ विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची सूचना डीआरएम आर.के.यादव यांनी केली. 70 दिवसात 33 कोटी रुपये उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट प्रसंगी यादव यांनी दिले.
अनधिकृत वेंडर्सवर कारवाईचे आदेश
डीआरएम यादव यांनी रेल्वे सुरक्षा बलाला अनधिकृत वेंडर्सवर कारवाईचे प्रसंगी आदेश दिले. रेल्वे स्थानकावर विनातिकीट फिरणार्या प्रवाशांसह रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांवर कारवाईचे प्रसंगी आदेश देण्यात आले. मंथली पासच्या नावाखाली रेल्वे स्लीपर डब्यात बसणार्या प्रवाशांना विनातिकीट गृहित धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना डीआरएम यादव यांनी केल्या. तिकीट निरीक्षकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे तसेच रेल्वेचा प्रतिमा उंचावेल, अशाच पद्धत्तीने आपले वर्तन असावे, अशा सूचना त्यांनी केल्या. रेल्वे स्थानकावर बायो टॉयलेटचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने प्रवाशांमध्ये जनजागृती करावी तसेच रेल्वे परीसरात अस्वच्छता करणार्या तसेच थुंकणार्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेशही देण्यात आले.