आठवड्याभरात वीज जोडणी होणार, उर्जामंत्र्यांशी झाली चर्चा
मुंबई:- सत्तर वर्षांनंतर एलिफंटावर वीज येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 70 वर्षांपासून एलिफंटावर वीजेच्या जोडण्या नव्हत्या. मात्र, येत्या आठवड्याभरात एलिफंटावर वीज जोडणी करण्यात येणार असल्याची माहिती रावल यांनी दिली. याबाबत आपली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चादेखील झाली असल्याची माहिती रावल यांनी दिली. दि. 27 आणि 28 जानेवारी रोजी 29 व्या एलिफंटा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या वीजेच्या जोडण्या देण्याची चाचणी सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल अशी आशा रावल यांनी व्यक्त केली. वीज जोडणी दिल्यानंतर प्रथम हा महोत्सव आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
युनेस्कोच्या जागतिक वारसा ठिकाणांच्या यादीत स्थान असलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांच्या परिसरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जागतिक वारसा लाभलेल्या या ठिकाणी पार पडत असलेल्या या महोत्सवात विविध नृत्य, संगीत आणि कलांचे सादरीकरण करण्यात येते. राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच कला प्रकारांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन करणे आणि पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे या महोत्सवामागील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. एलिफंटा येथील स्थानिकांसोबत मिळून महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि एअरबीएन कंपनीसोबत हातमिळवणी करून पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती रावल यांनी दिली. या ठिकाणी विकासाची कामे राबविण्यात येणार असून केबल कार प्रकल्प सुरू करण्याचे विचाराधीन आहे. तसेच एलिफंटाला ब्रँडिंग रिब्रँडिंग करणार असल्याचेदेखील ते म्हणाले.
पर्यटकांना रात्रीपर्यंत थांबता येणार
सुरक्षेच्या कारणास्तव एलिफटा या ठिकाणी पर्यटकांना जास्त वेळ थांबण्याची संधी देण्यात येत नव्हती. मात्र, आता पर्यटकांना या महोत्सवाच्या माध्यमातून रात्री 10.30 पर्यंत थांबण्याची संधी मिळणार असल्याचे रावल म्हणाले. यासाठी योग्य त्या परवानग्या घेण्यात आल्या असून पर्यटकांच्या सुरक्षेची योग्य ती काळजीदेखील घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.