पुणे । चूल आणि मूल या रहाटगाड्यातून स्त्रियांना बाहेर काढत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्रीबाई फुले यांनी रोवली. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या घटनेला 170 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 70 विद्यार्थिनींनी भिडे वाड्याला मानवंदना देत पुष्पवृष्टी केली. मुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिलेल्या या क्रांतीज्योतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भिडे वाड्याचे पूजन देखील यावेळी करण्यात आले. फुले पती-पत्नींच्या वेषातील कलाकारांनी यावेळी मुलींचा वर्ग घेत भिडे वाड्याचा इतिहास उलगडला.
इतिहास प्रेमी मंडळातर्फे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील भिडे वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोक गोडसे, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, मोहन शेटे आदी उपस्थित होते. दिव्या ढमाले आणि शुभंकर माळवदे या कलाकारांनी तसेच सेवासदनच्या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.
शेटे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी समाजाकडून होणारा अन्याय सहन करीत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना शिकविण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. त्यांच्यामुळेच आज मुली चांगले शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्या पुढेच आहेत. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.