लंकेच्या संघात मलिंगाचे झाले पुनरागमन 

0

कोलंबो : श्रीलंकेच्या संघात लसिथ मलिंगाचे पुनरागमन झाले आहे. मलिंगाच्या निवड संघाच्या गोलंदाजीसाठी जमेची बाजू आहे. गोलंदाजीची अनोखी शैली आणि अचूक यॉर्करसाठी ओळखला जाणाऱया श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. द.आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार असून १७ फेब्रुवारी रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना खेळविण्यात येणार आहे.

पुढील दोन सामने व्हिक्टोरिया आणि अॅडलेडवर अनुक्रमे १९ व २२ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. द.आफ्रिका दौऱ्यातील फॉर्म श्रीलंकेच्या संघाने कामय ठेवला तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत देखील ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची संधी श्रीलंकेला आहे. मॅथ्युज दुखापतग्रस्त असल्याने संघाची धुरा उपूल थरंगा याच्याकडे देण्यात आली आहे. दुखापतीमुळे मलिंगाला सामन्यांना मुकावे लागले होते. अखेर दुखापतीवर मात करून मलिंगा आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. मलिंगासोबतच कपुगेदरा सुद्धा श्रीलंकेच्या संघात पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयात संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्त्व मलिंगा सांभाळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर फिरकीची बाजू चायनामन गोलंदाज लक्षन सांभाळणार आहे.