जळगाव । शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 116 मध्ये गुरूवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास डॉक्टर नव्हेत. त्या ठिकाणी आलेल्या चहावाल्याने डॉक्टर असल्याचे सांगून महिलेला तपासले. दरम्यान, काही वेळ झाल्यानंतर महिलाचा पती त्या ठिकाणी आल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी चहावाल्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हा सर्व गोंधळ दोन तास सुरू होता.
दोन तास चालला गोंधळ
गुरूवारी सकाळी तपासणीसाठी डॉक्टर नसल्यानमुळे दुपारच्या सत्रात शल्य तपासणी विभागाजवळ (वॉर्ड क्रमांक 116) आंबेलतांडा (ता. जामनेर) येथील 26 वर्षीय विवाहिता ही तपासणीसाठी उभी होती. दोन दिवसांपासून ती पतीसह उपचारासाठी फिरत होती. गुरूवारी पुन्हा ती उपचारासाठी आली. तिच्या मानेला झालेल्या गाठीवर उपचार घेण्यासाठी आलेली होती. त्यामुळे दुपारी 3.30 वाजेपासून ती वॉर्ड क्रमांक 116 जवळ उभी होती. दुपारी 4 वाजेच्या सुमारास महिलेचा पती डॉक्टरांना शोधण्यासाठी गेला. त्याच वेळी हर्शल उर्फ दादा गोकूळ पाटील (वय 19, रा. रामेश्वर कॉलनी) हा चहा विक्रेता त्या ठिकाणी आला.
पोलिसांनी घेतले ताब्यात
तो देखील त्या ठिकाणी मान दूखत असल्याने डॉक्टरांना दाखविण्यासाठी आला होता. परंतू त्याने संबंधीत महिलेला विचारले. काय त्रास होतोय. तिने मानेवर गाठ असल्याचे सांगितल्यानंतर हर्शलने तिला डॉक्टर असल्याचे सांगून वॉर्ड क्रमांक 116 मध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी टेबलवर तिला झोपण्यासाठी सांगितले. मानेवरच्या गाठीला हात लावून बघत असताना त्या महिलेचा पती त्या ठिकाणी आला. त्याने हर्शलला कोण असल्याचे विचारले. त्याने डॉक्टर असल्याचे सांगितले. मात्र त्याने हर्शलला ओळखले. महिलेच्या पतीसह असलेल्या नातेवाईकांनी हर्शलला चोप देण्यास सुरूवात केली. त्याला मारत मारत पोलिस चौकीकडे आणले. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी हर्शलला ताब्यात घेतले.