रहाटणी कोकणे चौकातील ‘एटीएम’साठी रोकड लूट प्रकरण
पिंपरी-चिंचवड : एटीएममध्ये भरण्यासाठी अॅक्सिस बँकेची दिलेली रोकड घेऊन कॅशव्हॅनसह फरार झालेला चालक अजूनही बेपत्ताच आहे. मात्र, पोलिसांनी या सार्या प्रकरणाचा अवघ्या 72 तासांत छडा लावत यामध्ये सहभागी असलेल्या मुख्य तीन आरोपींना अटक केले आहे. तसेच लूट झालेली 74 लाख 50 हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे. छोटे-छोटे पुरावे गोळा करीत पोलिस प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले आणि रोकड केवळ एकट्या चालकानेच पळविली नाही, तर यामागे आणखी काहीजणांचा समावेश असल्याचे उघड केले. रक्कम लुटीची घटना बुधवारी (दि. 31) दुपारी दीडच्या सुमारास रहाटणी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम शाखेजवळ घडली होती.
तिघेही आरोपी सराईत
रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर), असे या व्हॅन चालकाचे नाव आहे. तो अद्याप फरार आहे. तर त्रिंबक गणपती नहिराळे (वय 37, रा. मांडवजाळी, ता. जि. बीड), अमोल लक्ष्मण धुते (वय 27,साई पार्क, माऊलीनगर, दिघी), विठ्ठल रामहरी जाधव (वय 34, रा. लोळदगाव, ता. गेवराई, जि. बीड), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ब्रिक्स कंपनीची कॅश व्हॅन
ब्रिक्स इंटरनॅशनल या कंपनीची गाडी (एम. एच. 14, सीएक्स 5711) रणजित कोरेकर चालवत होता. बुधवारी सकाळी ही गाडी डेक्कन येथून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघाली. दुपारपर्यंत सात एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. गाडीमध्ये सुरक्षा रक्षक, दोन कॅशियर आणि चालक असे चौघे होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास शिवार चौक, रहाटणी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि कॅशियर एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी उतरले असता चालक रणजित कोरेकर याने गाडी घेऊन धूम ठोकली. यावेळी गाडीमध्ये 74 लाख 50 हजार रुपयांची रोकड होती.
मोटारीतून व्हॅनचा पाठलाग
आरोपी ईटीऑस कार (एम एच 48, एफ 1984) मधून पैसे असलेल्या वाहनाचा पाठलाग करीत होते. कॅश वाहन चोरण्याची संधी साधून चौघांनी मिळून भोसरी येथून सर्व कॅश ईटीऑस कारमध्ये ठेवून पळाले. बुधवारी रात्री उशिरा पळवून नेलेली व्हॅन भोसरी एमआयडीसी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. मात्र, त्यामधील रोख रक्कम घेऊन चालक रणजित कोरेकर फरार झाला होता. गुरुवारी शिक्रापूर हद्दीत ज्या पेटीमध्ये कंपनीने पैसे भरून ठेवले होते, ती पैशांची पेटी सापडली. पण सापडलेली पेटी मोकळी होती.
वाकड पोलिसांचे यश
काही वेळेच्या फरकाने एक-एक गोष्टी समोर येत असल्याने हा पूर्वनियोजित कट तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यावरून वाकड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले, व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा गुन्हा उघडकीस आला. प्रकरणाचा 72 तासांमध्ये तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.