72 तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर अपहृत ओमची सुटका!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : घराजवळील पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ओम संदीप खरात (वय सात वर्षे) या चिमुकल्याचे काळ्या काचा लावलेल्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात आरोपींनी निगडी पूर्णानगर येथून अपहरण केले होते. संदीप खरात यांचा इलेक्ट्रॉनिक्स पॅनल बनविण्याचा कारखाना असून, अपहरणकर्त्यांनी ओमच्या सुटकेसाठी 60 लाख रुपयांची खंडणीही त्यांना मागितली होती. याप्रकरणी तातडीने निगडी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जोरदार शोधमोहीम राबविली. त्यासाठी दोन पथके तैनात करण्यात येऊन सुमारे 400 पोलिस अधिकारी व कर्मचारी या शोधमोहिमेत सहभागी झाले होते. मोबाईल टॉवर लोकेशनवरून पोलिस अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असतानाच, घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी ओमला वडिलांच्या कारखान्याजवळ सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या अपहरणप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, रोशन शिंदे (वय 20, रा. तळवडे) आणि अक्षय जामदारे (वय 21, कुडाळवाडी) अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, सावकारी कर्ज फेडण्यासाठी ओमचे अपहरण केले होते, असे सांगितले आहे. या संपूर्ण अपहरण प्रकरणाचा उलगडा पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ओमला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्त केले. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. अपहरण केल्यानंतर आरोपींनी चिमुकल्या ओमला कारच्या डिक्कीत कोंबून ठेवले होते. त्यामुळे तो बराच भेदरलेला दिसून आला.

ओमला डिक्कीत कोंबले; अपहरणकर्ते ओळखीचेच निघाले!
निगडीतील पूर्णानगर येथून शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ओम खरात या चिमुकल्याला पार्किंगमध्ये तो खेळत असताना पांढर्‍या रंगाच्या व काळ्या काचा असलेल्या मोटारीतून आलेल्या अज्ञातांनी उचलून नेले होते. पार्किंगमध्ये त्याच्यासोबत खेळत असलेल्या मुलांनी याबाबत त्याच्या आई-वडिलांना ताबडतोब माहिती दिली. त्यामुळे खरात कुटुंबीयांमध्ये एकच हल्लकल्लोळ निर्माण झाला. काही वेळातच संदीप खरात यांना अपहरणकर्त्यांचा फोन आला. त्यांनी ओमला ठार मारण्याची धमकी देत, 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे घाबरलेल्या संदीप खरात यांनी तातडीने या घटनेची माहिती निगडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवित तब्बल 400 पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांची दोन पथके तपासासाठी बनविली. आरोपी वारंवार आपले लोकेशन बदल होते. निगडीच्या केरळ भवन येथून शोधकार्याची सूत्रे हलविण्यात येत होती. या ठिकाणी दोन पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकार्‍यांनी तळ ठोकला होता. पोलिस आपला माग काढत असून, मोबाईल लोकेशनवरून शोध घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ओमला संदीप खरात यांच्या कारखान्याजवळ सोडून पळ काढला व तशी माहिती संदीप खरात यांना फोनवर दिली. संदीप व पोलिस तातडीने कारखान्याकडे पोहोचले. तेथे ओम सुरक्षित असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. संदीप खरात यांच्या तर अश्रूचा बांध फुटला होता. त्यानंतर अपहरणकर्त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी तातडीने सूत्रे गतिमान केली. दरम्यान, दोन्हीही आरोपी पोलिसांच्या अंदाजानुसार, संदीप खरात यांच्या ओळखीचे असून, त्यांनी गणेश उत्सवाच्या काळातच ओमच्या अपहरणाचा डाव रचला होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

पाणावलेल्या डोळ्यांनी वडिलांनी मानले पोलिसांचे आभार
अपहरणकर्ते संदीप खरात यांना ओळखणारे असावेत, या शक्यतेतून पोलिसांनी दोन तरुणांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रोशन शिंदे (वय 20, रा. तळवडे) आणि अक्षय जामदारे (वय 21, कुडाळवाडी) अशी त्यांची नावे आहेत. रोशन शिंदे याने सावकारी कर्ज काढून मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरु केली होती. परंतु, या व्यवसायात त्याचे बरेच नुकसान झाले होते. त्यामुळे त्याला व्यवसाय बंद करावा लागला. तसेच, त्याला सावकारी कर्जही फेडायचे होते. त्याचा मित्र अक्षय जामदारे हाही पैशाच्या कारणावरून अडचणीत असल्याने या दोघांनी ओम खरात या चिमुकल्याच्या अपहरणाचा बेत रचला. व त्याचे घराच्या पार्किंगमधून अपहरण करून त्याच्या वडिलांना 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु, पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व निगडी पोलिसांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार शोधमोहीम राबवून ओमला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडविले. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत स्वतः रश्मी शुक्ला यांनी दिली. यावेळी संदीप खरात यांना मुलगा सुखरूप परत मिळाल्याबद्दल आपले आनंदाश्रू लपविता आले नाहीत. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. अपहरणकर्त्यांनी ओमला कारच्या डिक्कीत लपवून ठेवले होते. तेथेच त्याला एकवेळ जेवण दिल्याचे ओमने सांगितले. ओमची सुटका झाल्याच्या आनंदात निगडीच्या एका बेकरी मालकाने खास आणलेला केकही रश्मी शुक्ला यांनी ओमला भरविला.