72 तासांत 6 जवान शहीद

0

श्रीनगर (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 72 तासांत दुसरा दहशतवादी हल्ला झाला असून, दोन्हीवेळा दहशतवाद्यांनी लष्करी छावणीला लक्ष्य केले आहे. सोमवारी श्रीनगरमधील करणनगर येथील सीआरपीएफ तळावर हल्ला करण्यात आला. त्यात झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. दहशतवादी एके-47 रायफलसह छावणीत घुसले. सुरक्षा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना पिटाळले. दहशतवाद्यांनी एका रिकाम्या इमारतीचा आसरा घेतला होता. त्यामधून त्यांनी गोळीबार केला. दुसरीकडे, जम्मूच्या सुजवान लष्करी छावणीत सलग 55 पेक्षा जास्त तासांपासून ऑपरेशन सुरु होते. शनिवारी पहाटे येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 5 जवानांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला. रविवारी छावणीमध्ये एक टँक पाठवण्यात आला होता.

हल्ल्यात 5 जवान शहीद, 12 जण जखमी
लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात क्वॉर्टरमध्ये एक सुभेदार, दोन जवान आणि एका वृद्धाचा मृत्यूदेह सापडला. आतापर्यंत दोन सुभेदारांसह पाच जवान शहीद झाले आहे. एका जवानाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. 6 जवानांसह 12 जण जखमी आहेत. यामध्ये लेफ्टनंट कर्नल रोहित सोळंकी आणि मेजर अविजिट सिंह यांच्यासह 6 जवान आणि 6 महिला व लहान मुले आहेत. लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जम्मू येथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. हल्ल्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) 5 जणांची टीम जम्मूमध्ये पोहोचली आहे. लष्कराला मिळालेले दहशतवाद्यांचे पुरावे ते तपासणार आहेत.

जखमी महिलेने दिला मुलीला जन्म
सुजवान येथे दहशतवादी हल्ल्यादरम्यान एक आनंददायी घटना घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या गर्भवती महिलेने रात्रभर मृत्यूशी दोन हात करत एका मुलीला जन्म दिला. शनिवारी गोळीबाराचा आवाज ऐकून रायफलमॅन नजीर अहमद यांची पत्नी शहजादा खान या घराबाहेर पडल्या होत्या; परंतु त्याच वेळी त्यांच्या कंबरेखालील भागाला एक गोळी लागली. त्यांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी तत्काळ धाव घेत त्यांना घरात ओढले. त्यानंतर गर्भवती महिला जखमी झाल्याची सूचना मिळताच एक वाहन पाठवून शहजादा यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

दोन दहशतवादी लपल्याची शक्यता
लष्करी तळात सोमवारी पहाटे 4.30 वाजता संशयित हालचाली होत असल्याचे एका जवानाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ हालचालीच्या दिशेने गोळीबार केला. दहशतवाद्यांनी तत्काळ तेथून पळ काढला आणि बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा आसरा घेतला. सीआरपीएफच्या जवानांनी या इमारतीला घेरले असून दोन्ही बाजूंनी गोळीबारांची धुमश्चक्री सुरु होती. या इमारतीत दोन दहशतवादी असण्याची शक्यता आहे, असे सीआरपीएफ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेला गोळीबार पाहून आणखी जवान पाठवण्यात आले होते. सुभेदार मदन लाल चौधरी, सुभेदार मोहम्मद अशरफ मीर, हवलदार हबीबुल्लाह कुरैशी, नायक मंजूर अहमद, लांस नायक मोहम्मद इकबाल, लांस नायक मो. इकबाल यांचे वडील (सिव्हिलियन) अशी शहिदांची नावे आहेत.

पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची भीती
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने नियंत्रण रेषा पार करत सर्जिकल स्ट्राइक यशस्वी केला होता. भारताने हे पाऊल उचल्यास त्याला प्रत्युत्तर मिळू शकते अशी धमकीच पाकने भारताला दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला असून, भारतावर अनेक आरोपही करण्यात आले आहेत.