72 बालके कमी वजनाची

0

बारामतीत तालुक्यातील अंगणवाड्यांमार्फत दिला जाणार अतिरिक्त आहार

बारामती। बारामती तालुक्यात एकूण 72 बालके कमी वजनाची आढळून आली आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील कमी वजनाच्या बालकांसाठी आता अतिरिक्त आहार दिला जाणार आहे. माळेगाव खुर्द येथे महिला व बालविकास योजनेंतर्गत बालग्राम विकास केंद्राचे उद्घाटन बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक नवले, विस्तार अधिकारी पूनम मराठे, विस्तार अधिकारी विलास बंडगर, पर्यवेक्षीका यशोदा वाबळे, अंगणवाडी सेविका बायडा मोरे, पुष्पा जाधव, बालके आदि उपस्थित होते.

बारामती तालुक्यात 72 कमी वजनाची बालके आढळून आली आहेत. कमी वजनाच्या बालकांना आहार देण्याच्या अगोदर त्यांचे वजन तपासून नोंद ठेवली जाणार आहे. बारामती तालुक्यात 50 ठिकाणी 60 दिवस अंगणवाडीतच सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत दर दोन तासाला वेगवेगळ्या पद्धतीने कमी वजनाच्या बालकांना आहार दिला जाणार आहे. गावपातळीवर बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे व भविष्यात सुदृढ पिढी निर्माण व्हावी, यासाठी बालग्राम विकास केंद्राबरोबर अंगणवाडीला लोकसहभागातून ग्रामस्थांनी सकारात्मकतेने पुढे येऊन फळे व इतर पोषक आहार देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी केले आहे.

लोहवर्धक, कॅल्शियमयुक्त औषधे देणार वजन वाढीसाठी
जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून लोहवर्धक, कॅल्शियमयुक्त औषधे, प्रोटीन कार्बोहायड्रेड असलेले पदार्थ असे वजन वाढीसाठी दिली जाणार आहेत. त्याचबरोबर आहारात अमायलेजयुक्त पीठाची लापशी, रवा, उपमा, खीर, शेंगदाणे, खोबर्‍याचा किस, उकडलेला बटाटा, अंडी, फळे, गूळ, शेंगादाणे, खजूर, राजगीरा लाडू, अंगणवाडीतील दोन वेळेतील आहार व घरचा आहार अशा पद्धतीने दिवसभरात बालकांना अतिरिक्त आहार दिला जाऊन ही योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

महिला व बालविकास विभागाकडून बारामती तालुक्यातील कमी वजनाच्या बालकांसाठी 60 दिवस अतिरिक्त आहार दिला जाणार असून पुणे जिल्ह्यात प्रथम बारामती तालुक्यात या योजनेचे उद्घाटन करून ही योजना राबवली जाणार, असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी दिली. अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांनी केलेल्या सर्वेक्षणात उंचीनुसार कमी वजनाची व बुटकी बालके यांची कमी वजनाची व सडपातळ बालके म्हणून निवड करण्यात आली आहे.