722 व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

0

आळंदी । श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा 722 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची सांगता शनिवारी (दि. 18) अलंकापुरीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात झाली. 9 नोव्हेंबरपासून अलंकापुरीत विविध कार्यक्रम झाले. यात श्री गुरु हैबतरावबाबा पायरी पूजन, दिंडीची मंदिर व नगरप्रदक्षिणा, श्रींचे पालखीची मंदिर व नगरप्रदक्षिणा, श्रींचा रथोत्सव, श्रींची पहाट पूजा, पूजेत पवमान अभिषेक, पूजा, आरती, महानैवेद्य, भाविकांच्या महापूजा, महाप्रसाद वाटप, मानकरी व पदाधिकारी यांचा सत्कार, परंपरेने नारळ प्रसाद वाटप, मंदिरात कीर्तन, हरिजागर सेवा, वीणेचा खडा पहारा तसेच आळंदीत विविध ठिकाणी नाम सप्ताह झाले. आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने आयोजित इंद्रायणी नदी घाटावर जनजागृती करणारा सहिष्णुतता सप्ताहात अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड व अध्यक्ष किसन महाराज साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सहात पार पडला.

भाविकांनी नामजयघोषात परतीचा प्रवास सुरू केल्याने आळंदीतील मठ, मंदिरे, इंद्रायणी नदी किनार्‍यावरील प्रांगण, धर्मशाळा परिसर मोकळा झाल्याने आळंदीत शांतता पसरली आहे. कार्तिक वारीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या वारकर्‍यांच्या दिंड्यांनी आळंदीचा परिसर फुलून गेला होता. टाळ मृदंगाच्या अखंड गजरात ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वारकर्‍यांनी माऊलींच्या चरणी कार्तिक वारीसाठी हजेरी लावत सेवा केली. यात लाखो वैष्णवांची नगरप्रदक्षिणा आणि झिम्मा-फुगड्यांसह वारकरी खेळाने अलंकापुरी परिसर माउलीमय झाला होता. तीन किलोमीटरचा परिसर वारकर्‍यांच्या गर्दीने फुलला होता. आता गर्दी ओसरल्याने पोलिस बंदोबस्त देखील कमी करण्यात आला आहे. सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.

स्वच्छता मोहीम
आळंदी नगरपरिषदेने अधिकचे कामगार लावून स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली आहे. कचरा हटविण्यासह जंतुनाशके, फवारणी, धुरीकरणासह रस्ते सार्वजनिक जागांचा परिसर स्वच्छतेला गती देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. आरोग्य विभाग व ठेकेदारा नियुक्त कामगार यांच्यात संवाद साधून शहर स्वच्छतेला गती दिली आहे. शहरात स्वच्छता कायम राहील, याची दक्षता घेण्याचे सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. नागरिकांच्या स्वच्छतेबाबत तक्रारी येणार नाहीत. याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

श्रींची नगरप्रदक्षिणा
श्रींचे संजीवन समाधी सोहळा कार्तिकी यात्रेअंतर्गत मंदिरात शनिवारी श्रींची आरती, महापूजा, दुधारती, परंपरेने फडकर्‍यांचे श्रीनां महापूजा, महानैवेद्य, श्रींची छबिना पालखीतून वैभवी मिरवणूक, नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी झाली. नामगजरात या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्याला आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक, अजित कुलकर्णी, योगेश देसाई, विलास ढगे, व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, श्रींचे चोपदार, सेवक राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, मानकरी, फडकरी, पुजारी, ग्रामस्थ आदींनी देवस्थानातील परंपरा कायम ठेवत सोहळ्याचे यशस्वीतेस परिश्रम घेतले.

सुसंवादामुळे यात्रा शांततेत
या सोहळ्यास पुणे जिल्हा प्रशासनाचे मोठे योगदान राहिले. सोहळा व कार्तिकी यात्रा उत्साही शांततेत हरिनाम गजरात यशस्वीरीत्या पार पडला, याचे समाधान वाटत असल्याचे आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. यात्रेत शासकीय, निमशासकीय व सेवाभावी संस्था यांच्या नियोजनात कायम राहिलेला सुसंवाद यामुळे राज्यातून आलेल्या भाविकांना आळंदी यात्रेत विविध सेवा सुविधा देता आल्या. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने प्रभावी दखल व दक्षता घेतल्याने नागरी सुविधांची गैरसोय झाली नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाचे भाविकांतून कौतुक झाल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी यात्रेच्या नियोजनावर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रांत आयुष प्रसाद, तहसीलदार सुनील जोशी, पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे, मुख्याधिकारी समीर भूमकर, आळंदी नगरपरिषद व आळंदी देवस्थानचे पदाधिकारी आदींचे लक्ष कायम राहिल्याने आळंदी यात्रा शांततेत व सुरक्षितपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.