हैदराबाद : कोहली या सामन्यात २०४ धावांवर बाद झाला. बांगलादेशच्या तैजुल इस्लामने कोहलीची विकेट घेतली. कोहली तैजुलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पण रिप्लेमध्ये पाहिले असता कोहलीने त्याच्या सहकारी फलंदाज वृद्धीमान साहाचे ऐकले असते तर पंचांना त्यांच्या निर्णय बदलावा लागला असता. १२६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तैजुलच्या गोलंदाजीवर कोहली पायचीत झाला. तैजुलचा चेंडू कोहलीच्या पॅडवर आदळला. पंचांनी कोहलीला बाद घोषित करण्यात क्षणाचाही विलंब केला नाही. कोहली पंचांच्या निर्णयावर डीआरएस प्रणालीचा उपयोग करून रिव्ह्यूची मागणी करेल, असे वाटले होते. समोर उभा असलेला वृद्धीमान साहा यानेही कोहलीला रिव्ह्यू घ्यायचा का? अशी विचारणा केली. पण कोहलीने रिव्ह्यू घेण्याचे टाळून मैदानातून बाहेर जाणे पसंत केले. कोहली मैदानातून बाहेर जाताना उपस्थितांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत त्याच्या द्विशतकी कामगिरीचे कौतुक केले. कोहली पहिल्या स्लिपच्या दिशेने लेटकट खेळताना चुकला होता. बॅटला चेंडू आदळण्यापूर्वी त्याच्या पॅडवर आदळला. रिव्ह्यूमध्ये कोहली नाबाद असल्याचे निष्पन्न झाले.