पिंपळे सौदागर येथील धक्कादायक घटना
पिंपरी-चिंचवड : अॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी देण्यात आलेली तब्बल 74 लाख रुपयांची रक्कम व्हॅनसह चालकानेच पळवून नेली. बुधवारी भरदुपारी अॅक्सिस बँकेच्या पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला. या व्हॅनचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करत, दिवसभर शहराच्या चारही दिशांनी नाकाबंदी करण्यात आली होती. रात्री उशिरा ही व्हॅन भोसरीत सापडली. परंतु, चालक लाखो रुपये घेऊन पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली. रणजीत कोरेकर (मूळ राहणार बार्शी, जि. सोलापूर) असे या फरार चालकाचे नाव आहे. कॅश व्हॅन सेवा पुरविणार्या ब्रिंग्ज इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकाने याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
बँकेचे अधिकारी खाली उतरताच पळाला!
पोलिसांच्या माहितीनुसार, अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी चौघे कॅश व्हॅनमधून रोख रक्कम घेऊन आले होते. त्यापैकी सुरक्षा रक्षकासह तिघे बँकेत गेले. ही संधी साधून व्हॅन चालक रणजीत कोरेकर याने 74 लाख रुपयांच्या रोख रकमेसह व्हॅन पळवून नेली. हे तिघे बाहेर येताच त्यांना व्हॅन दिसली नाही, त्यामुळे त्यांनी तातडीने बँकेच्या वरिष्ठांना व ब्रिंग्ज इंडिया कंपनीच्या अधिकार्यांना कळवले. या घटनेने बँकेचे अधिकारीही हादरून गेले होते. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वाकड व सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तातडीने नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. परंतु, व्हॅनचालक फरार होण्यात यशस्वी झाला. परिसरातील चौकांमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तातडीने काही पोलिस पथके व्हॅनच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. पळवून नेलेली व्हॅन पोलिसांना भोसरीत सापडली. परंतु, चालक फरार झाला होता. ब्रिंग्ज इंडियाचे व्यवस्थापक शिवदत्त आढे यांनी वाकड पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून, तब्बल साडेआठ तासानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली होती. या लुटीत अन्य काही कर्मचारी सहभागी आहे का? व्हॅन चालकाची कंपनी व बँकेकडे असलेली माहिती, याचा तपासही पोलिस करत होते.
पोलिस, अधिकार्यांकडून कारवाईबाबत गुप्तता
रोख रकमेसह व्हॅन पळवून नेण्याची घटना यापूर्वी 30 सप्टेंबर 2017 रोजीही हडपसर येथे घडली होती. या घटनेत आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या चालकाने सुमारे चार कोटी रुपये व व्हॅन पळवून नेली होती. हा आरोपी पुढे काही दिवसांतच पोलिसांनी गजाआड केला होता. कॅश व्हॅनवर ठेवले जाणारे चालक व त्यांची संपूर्ण माहिती बहुतांश ही सेवा पुरविणार्या कंपन्या तसेच बँकाही ठेवत नसल्याने अशा घटना घडत असल्याची माहितीही पोलिस अधिकार्यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिस कमालीची गुप्तता पाळत असल्याने बँकेचे अधिकारी व पोलिस दोघांच्याही कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. फरार चालक हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील असून, त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिस तपासात होते. तसेच, तो घरी जाण्याची शक्यता पाहाता, पोलिस पथक बार्शीकडे रवाना झाले होते.