74 लाख घेवून पळालेला व्हॅनचालक अद्याप फरारच

0

शिक्रापूरजवळ पेटी सापडली; पण रिकामीच!

पिंपरी-चिंचवड : ‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी आणलेले 74 लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याच्या धक्कादायक घटनेला 30 तास उलटूनही चालकाचा तपास लागलेला नाही. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अ‍ॅक्सिस बँकेच्या रहाटणी येथील शाखेमध्ये ही घटना घडली होती. दरम्यान, ज्या पेटीमध्ये कंपनीने पैसे भरून ठेवले होते, ती पेटी शिक्रापूरच्या पुढे सापडली. ती मोकळीच आहे. रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे या फरार व्हॅन चालकाचे नाव आहे.

कंपन्यांचे अधिकारी पोहोचले तीन तासांनी
रहाटणी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेमध्ये असलेल्या एटीएममध्ये भरण्यासाठी 74 लाखांची रोकड घेऊन व्हॅन आली होती. यावेळी गाडीतील सुरक्षारक्षक खाली उतरले. गाडीमध्ये कोणीही नसल्याचे पाहून व्हॅन चालक रणजित कोरेकर याने व्हॅनसहित 74 लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. एटीएममध्ये रोकड भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरक्षा रक्षक पुरविणारी कंपनी, पैसे पुरविणारी कंपनी आणि वाहन पुरवणारी कंपनी अशा विविध संस्था काम करीत असतात. घटना घडल्यानंतर या सर्व कंपन्यांना कळवून त्यांच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी यायला सुमारे दोन ते तीन तासांचा कालावधी लागला.

…पलायनास मिळाला अवधी
संबंधित कंपन्यांचे सक्षम अधिकारी घटनास्थळी येण्यासाठी व त्यांना माहिती मिळण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे पोलिसांना वर्दी देखील उशिराच मिळाली. याचा फायदा कदाचित चालकाला शहराबाहेर पडायला झाला असल्याची चर्चा सध्या शहरात होताना दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसहित वाकड व सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून व्हॅनचा शोध सुरु केला. दरम्यान पळवून नेलेली व्हॅन भोसरी येथे एका कंपनीजवळ आढळून आली मात्र त्यामधील रोख रक्कम घेऊन चालक रणजित कोरेकर फरार झाला.

चालक व्यसनी
घटनेला चोवीस तास उलटल्यानंतर देखील आरोपीला पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश आले नाही. मात्र शिक्रापूरच्या पुढे पैसे ठेवलेली लोखंडी पेटी आढळली असून त्यासोबत नोटांच्या बंडलवर लावण्यात आलेल्या पावत्या देखील सापडल्या आहेत. काही वेळेच्या फरकाने एक-एक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान आरोपी रणजित धर्मराज कोरेकरच्या घरी पोलिसांनी भेट दिली. यावेळी आरोपीला दारूचे भयंकर व्यसन असल्याचे समजले. तसेच तो संबंधित कंपनीमध्ये बदली चालक म्हणून काम करीत होता.