74 वर्षीय वृद्धाचा इलेक्ट्रीक शॉक लागताच मृत्यू : जळगावातील घटना

An elderly man in Kanchan Nagar died due to electric shock जळगाव : टेबल फॅन सुरू करतांना विजेचा धक्का लागल्याने कांचन नगरातील 74 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रतन निना साळुंखे (74, रा.कांचन नगर, जळगाव) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

जागीच झाला मृत्यू
रतन साळुंखे हे कांचन नगरात एका पार्टेशनच्या खोलीत एकटेच वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंबीय घरासमोर राहते. मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी 5 वाजेच्या सुमारास टेबल फॅन सुरू करण्यासाठी उभे राहिले असता त्यांचा हात पंख्याला लागताच हाताला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यावेळी पंख्या सहित ते खाली कोसळले. ही बाब लक्षात येताच शेजारच्या नागरीकांनी तात्काळ धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी मयत साळुंखे यांना घोषित केले. या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना असा परीवार आहे.