पुणे । हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईमंदिराचा देखावा यंदा सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळतर्फे साकारण्यात आली आहे. या देखाव्याचे उद्घाटन व श्रींची प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाली. छत्रपती राजाराम मंडळाने यंदा पुण्याच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त हा देखावा साकारला आहे. यावेळी साई संस्थानाचे विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे आदी उपस्थित होते.
मंदिराची रचना पाहिल्यास प्रत्यक्ष शिर्डीत असल्याचा भास होतो. शिर्डी साई मंदिराची रचना व मांडणी याचा सखोल अभ्यास करून हा देखावा साकारण्यात आला आहे. मंदिराची सुरुवात खंडोबा मंदिराने होते, त्यानंतर बाबांची शिळा, मुख्य् सभामंडप, बाबांचे समाधी स्थान, साईबाबांची मूर्ती, गाभारा, द्वारकामाई, गुरुस्थान, मारुती मंदिर, चावडी, अब्दुलबाबा दर्गा, नंदादीप, पीरचे ठाणे आदींचा समावेश आहे. निंबाळकर म्हणाले, हिंदुस्थानातील पहिला गणपती बसविणारे भाऊसाहेब रंगारी यांनी राजाराम मंडळाची मूर्ती साकारली आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा उभारण्यात आला आहे. दहा दिवसांत गणेश आराधना आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.