75 वर्षांच्या आजींनी एका दिवसात सर केला हरिश्‍चंद्रगड

0

जुन्नर : तब्बल 75 वर्षांच्या आज्जींनी राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक उंचीचा हरिश्‍चंद्रगड एका दिवसात सर करून इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो, याची प्रचिती दाखवून दिली. हिराबाई दत्तात्रय शिंदे असे या साहसी आजींचे नाव आहे.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातील हिराबाई यांचा नातू निखिल हा गिर्यारोहक असून राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची तो नेहमीच भ्रमंती करत असतो. घरी आल्यानंतर तेथील साहसी अनुभवही सांगतो. त्याच्या त्या सांगण्यातून आजी हिराबाई यांनाही एखादा तरी डोंगर सर करावा, अशी इच्छा झाली. त्यांची उत्कट इच्छा त्यांच्या नातवानेही मनावर घेतली आणि आजींच्या गिर्यारोहणाची तयारी सुरू झाली.

चालण्याचा केला सराव

गिर्यारोहणासाठी आज्जींनी काही दिवस चालण्याचा सराव केला. नातवाच्या मार्गदर्शनाखाली हलका व्यायाम सुरू केला आणि स्टॅमिना तयार झाल्यावर थेट हरिश्‍चंद्रगड सर करायचा निश्‍चय झाला. शंकरभक्त व पिंपळेश्‍वर मंदिराच्या पुजारी असलेल्या हिराबाई शिंदे त्यांच्या नातवासोबत गड सर करण्यासाठी तयार झाल्या. आर्श्‍चयाची बाब म्हणजे त्यांनी एका दिवसात गडावरील सर्वोच्च उंचीचे तारामती शिखर गाठले.

अंधारात चुकली वाट

दिवसा लख्ख प्रकाशात अतिशय उत्साहात आजी हिराबाई यांनी गड सर केला खरा. मात्र, परतीच्या प्रवासात घळईमार्गे उतरताना अंधार झाला. गडावरील पाऊलवाटेवरून येताना अनेक फाटे फुटताना त्यांना नेमका मार्ग सापडेना व दोघेही वाट चुकले. तासाभरानंतर निखिल यांनी त्या परिसरातील मित्रांना फोनवर संपर्क केला. त्यानंतर रात्रीच्या वेळी गडाच्या पायथ्याशी असलेले असलेले चिंतामण कवठे हे त्यांच्या दोन सहकार्‍यांना घेऊन त्यांना शोधण्यासाठी गडावर गेले आणि रात्रीच्या अंधारात त्या दोघांनाही त्यांनी सुखरूप गडाखाली आणले.