शिंदखेडा। शिंदखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी मथुराबाई मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतेच नगरपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे यांनी मराठे यांची निवड झाल्याचे घोषीत केले. 75 वर्षीय मथूराबाई नामदेव मराठे यांनी आपल्या राजकिय जीवनाला 2000 सालापासून सुरूवात केली. त्यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्या प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या. त्यावेळी देखील विवीध विकास कामे केली. त्यामुळे आपल्या वॉर्डात त्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली. म्हणूनच 2012 मध्ये झालेल्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत प्रथम नगरसेविका होण्याचा बबहुमान मान मिळाला. त्यांनी आरोग्य व शिक्षण सभापती म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. शहरातील मराठा समाजातील प्रथम महिला नगराध्यक्षा होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.
पंधरा महिन्यांचा अलिखीत करार
विमलबाई या आपल्या वॉर्डात व नगरपंचायतीमध्ये ’आजी’ म्हणून प्रसिध्द आहेत. त्यामुळे ’आजी झाल्या नगराध्यक्षा’ अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. शिंदखेडा नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 2012 मध्ये झाली. त्या माजी पं.स.सभापती प्रा.सुरेश देसले व त्यांचे प्रतिस्पर्धी माजी सरपंच अनिल वानखेडे यांच्या गटाला प्रत्येकी आठ जागा मिळाल्या व एक जागा शिवसेनेला मिळाली. शिवसेनेच्या सदस्याचा पाठिंबा घेत प्रा.देसले गटाने प्रथमतः सत्ता स्थापन केली. अडीच वर्ष कालावधीनंतर दोन्ही गट एकत्र आलेत. उर्वरीत तीस महिन्याच्या कालावधीतील पंधरा-पंधरा महिने दोन्ही गटाचे नगराध्यक्ष असतील असा अलिखीत करार झाल्याने अनिल वानखेडे यांच्या गटाच्या शहनाज बागवान यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण करून 11 मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
फटाके फोडून आनंद साजरा
मध्यंतरीच्या काळात दीपक देसले यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी 18 मे रोजी जिल्हाधिका-यांनी नगरसेवकांना अजेंडा काढला होता. नूतन नगराध्यक्ष पदासाठी 22 मे रोजी प्रा.देसले गटाच्या मथुराबाई मराठे यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे दोन अर्ज दाखल केले. मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले. या बैठकीस नगरसेवक दिपक देसले, उल्हास देशमूख, तुकाराम माळी, शहनाज बागवान, सुनंदा माळी, बानूबाई भिल, प्रमिलाबाई पाटील, निर्मलाबाई माळी, शबनमबी शेख मन्सूर शेख, अशोक देसले, निंबाजी सोनवणे, किरण थोरात, चंद्रसिंग राजपूत, सुषमा चौधरी, उषाबाई भिल, सोनाली महिरे, किरण चौधरी, उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवडीबाबत चर्चा होऊन नगरसेवक उल्हास देशमुख यांच्या नावावर शिक्कार्मोतब करण्यात आले. दिपक देसले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.