मुंबई । वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहात विशेष कार्यक्रमात लाल निशाण पक्षाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षात मंगळवार विलीनीकरण करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षात 1942 साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर 1965 साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापना झाली होती. त्यानंतर जवळजवळ 75 वर्षांनंतर मतभेद बाजूला सारून दोन पक्ष एकरूप झाले आहेत. या कार्यक्रमात भाकपचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड सुधाकर रेड्डी आणि खासदार कॉम्रेड डी. राजा हे यावेळी उपस्थित होते.
’देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विविधतेत एकता या मूल्यांवरच हल्ले होत आहेत. खासगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची लूट होत असून कामगारांच्या कायद्यांतही कामगारविरोधी बदल केले जात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी यावेळी केले.