नवी दिल्ली । नोटाबंदीमुळेच रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद सोडले असा दावा काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. रिझर्व्ह बँकेमधील एका व्यक्तीने नोटाबंदीविरोधात केंद्र सरकारला पाच पानी पत्र पाठवले होते. ज्या दिवशी रघुराम राजन यांनी गव्हर्नरपद सोडले त्याच दिवशी हे पत्र पाठवण्यात आले होते असे चिदंबरम यांचे म्हणणे आहे.
पद सोडले त्याच दिवशी पाच पानी पत्र
त्यामुळे ही पत्र पाठवणारी व्यक्ती रघुराम राजनच होती अशी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या ‘फिअरलेस इन ऑपोझिशन, पॉवर अॅड अकाऊंटबिलीटी’ या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पी. चिदंबरम यांनी रघुराम राजन यांनी नोटाबंदीमुळेच गव्हर्नरपद सो़डल्याचा आरोप केला. रघुराम राजन यांनी पद सोडले त्याच दिवशी रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला नोटाबंदीविरोधात पाच पानी पत्र पाठवण्यात आले. केंद्र सरकार स्वत:ला पारदर्शी म्हणत असेल तर त्यांनी हे पत्र जाहीर करावे असे आव्हानच चिदंबरम यांनी केंद्र सरकारला दिले आहे. सरकारने गव्हर्नर रघुराम राजन यांचे काम करणेही कठीण केले होते. यामुळेच त्यांनी हे पद सोडले. राजन नोटाबंदीचा विरोध करत होते पण सरकार त्यावर ठाम होते असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.