अमरावती । राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा सध्या सुळसुळाट आहेत. यातच आता आंध्रप्रदेशमधील विधानसभा अध्यक्ष शिवप्रसाद यांनी महिलांची तुलना गाडीशी करत वाद निर्माण केला आहे. महिलांना कारसारखे घरात पार्क करुन ठेवले तर बलात्कार, छेडछाडीसारख्या घटना होणारच नाही अशी मुक्ताफळे विधानसभा अध्यक्षांनी उधळली आहेत. विशेष म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी आयोजित कार्यक्रमामध्येच शिवप्रसाद यांनी हे विधान केले आहे.
राष्ट्रीय महिला संसदेच्या चर्चासत्रामध्ये वक्तव्य
आंध्रप्रदेशमध्ये राष्ट्रीय महिला संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातील चर्चासत्रामध्ये विधानसभा अध्यक्ष शिवप्रसादही सहभागी झाले होते. महिलांवरील अत्याचारासंदर्भात उदाहरण देताना त्यांनी महिलांची तुलना थेट कारशी केली. शिवप्रसाद म्हणाले, जेव्हा तुम्ही कार विकत घेता आणि ती गॅरेजमध्ये पार्क करता त्यावेळी अपघाताची शक्यता कमी असते. पण जेव्हा तीच कार रस्त्यावर नेता तर तिचा अपघात होण्याची शक्यता असते. 50 किमी या वेगाने कार चालवल्यावर अपघात होऊ शकतो आणि 100 किमी या वेगाने कार चालवल्यास अपघाताची शक्यता वाढते असे त्यांनी सांगितले.
गृहिणी होती त्यावेळी सुरक्षित!
पण यानंतर त्यांनी महिला अत्याचाराविषयी चिड आणणारे विधान केले. शिवप्रसाद म्हणाले, आधी महिला गृहिणी होती त्यावेळी सुरक्षित होती. पण शिक्षणामुळे आता त्यांना नवी संधी मिळू लागली. त्या नोकरी करतात आणि अगदी उद्योग क्षेत्रातही सक्रीय आहेत. महिला जेव्हा घरातून बाहेर पडतात त्यावेळीच छेडछाड, बलात्कारसारख्या घटना घडतात. ज्यावेळी घरातून बाहेर पडणार नाही त्यावेळी अशा घटनाही घडणार नाही असे बेजबाबदार विधान त्यांनी केले.