बंगळूर । येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. या टी-20 विश्वचषकात भारताने पहिल्या पराभवाचा वचपा काढीत अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे.विशेष म्हणजे याआधीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचाच पराभव केला होता. यंदाही भारतीय संघाने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने पाकिस्तानला रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.भारताने अंध टी – 20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद आपल्याकडे कायम राखले आहे.
अंतिम सामन्यात क्रिकेट मधील परस्पर विरोधी संघ भारत -पाकिस्तान समोरा-समोर आले होते. पाक संघाने प्रथम फलंदाजी करणार्याचा निर्णय घेवून 20 षटकात 9 बाद 197 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून बदार मुनिरने 37 चेंडूंमध्ये 57 धावांची खेळी करत पाकिस्तानला चांगली धावसंख्या उभारुन दिली. मुनिरने त्याच्या अर्धशतकी खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला. मुनिरला मोहम्मद जमिलने चांगली साथ दिली. जमिलने 15 चेंडूंमध्ये 24 धावा फटकावल्या. मुनिर आणि जमिलने 58 धावांची भागिदारी करत पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. भारताकडून केतन पटेल आणि जफर इक्बाल यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.
पाकिस्तानने 197 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय फलंदांजांनी न डगमगता फलंदाजी केली. अजय कुमार रेड्डी आणि प्रकाश जयरामय्या या सलामीवीरांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. भारतीय सलामीवीरांनी मोठ्या धावसंख्येचे दडपण न घेता अपेक्षित धावगती राखली. त्यामुळे 5 षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 54, तर 10 षटकांनंतर बिनबाद 109 होती. अजय रेड्डी 43 धावा काढून धावबाद झाला. मात्र तोपर्यंत भारतीय संघ विजयासमीप आला होता. संघाच्या 163 धावा झाल्या असताना रेड्डी माघारी परतला. पाकिस्तानने दिलेले 198 धावांचे आव्हान भारताने 18 व्या षटकात पार केले.