8 महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील कारखाना सुरू नाही

0

शिरपूर। शिसाकाची निवडणूक होवून 8 महिन्याचा कालावधी उलटला असून देखील कारखाना सुरू करण्यासंदर्भात कोणतेही हालचाल दिसत नाही. त्यातच शिसाका थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने जप्त केला आहे. त्यानंतर पुन्हा प्राव्हेडंट फंड विभागाने देखील जप्ती आणली आहे. यावर मार्ग काढून शिसाका ताबडतोब सुरू करावा, अशा आशयाचे निवेदन शेतकरी विकास फाऊंडेशनच्या वतीने शिसाका प्रशासनाला 8 रोजी निवेदन देण्यात आले आहे.

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होवून जवळपास 8 महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु कारखाना सुरू होण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीत. थकीत कर्जापोटी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सन 2012 पासून कारखाना जप्त केला आहे. त्यानंतर निवडणूक काळात प्रोव्हेडंट फंड विभागाने देखील कारखाना जप्त केला आहे. यावर न्यायालयात जावून प्रोव्हेडंट फंडच्या वसुलीस स्थगिती मिळविली. त्यामुळे या अडचणीतून मार्ग मोकळा झाला असला तरी सद्यस्थितीत कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. तो ताब्यात देण्यासाठी जिल्हा बँकेचे कर्मचारी दोन वेळा कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर देखील तत्कालीन संचालक मंडळ फिरकलेच नाही.

कारखाना सुरू होणे आवश्यक
शिसाका निवडणुकीत कारखाना सुरू करण्याची हमी दिल्यामुळे सभासदांनी विद्यमान संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना दिला आहे. सत्तेवर येवून मोठा कालावधी उलटलेला असतांना देखील आतापर्यंत कारखाना सुरू होवू शकला नाही. याबाबत विचार करून कारखाना सुरू करावा, कारखाना बंद असल्यामुळे शेतकरी, कामगार, अन्य घटकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे कारखाना सुरू होणे आवश्यक आहेत. यावर विचार होवून कारखाना सुरू करण्यासंदर्भात हालचाली व्हाव्यात असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. या निवेदनावर शेतकरी विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष ठाणसिंग पाटील, उपाध्यक्ष श्रीराम अशोक, सचिव अ‍ॅड.गोपाल राजपूत, उज्वलसिंग सिसोदिया, दिलीप लोहार, मोहन पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.